महावितरणची अहमदनगरमध्ये 125 कोटींची थकबाकी
By Admin
महावितरणची अहमदनगरमध्ये 125 कोटींची थकबाकी
नगर- प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात 3 लाख 77 हजार 148 वीजग्राहकांकडे 124 कोटी 58 लाख 47 हजार रुपयांची थकबाकी आहे. या रकमेच्या वसुलीसाठी महावितरणने थेट वीजजोड तोडण्याच्या कारवाईस सुरुवात केली आहे.
कोरोना लॉकडाऊन संपल्यावर मीटर तपासणीनंतर ग्राहकांना अचानक मोठय़ा रकमांची वीजबिले आली. त्यास विरोध करीत अनेकांनी बिल कमी होण्याच्या आशेवर बिल थकविले. त्यावर महावितरणने दंडही लावला. आता राज्य सरकारनेही वीजबिलात सूट देणार नसल्याचे स्पष्ट केल्यावर वीजग्राहकांचे धाबे दणाणले. आता थकबाकी वसुलीसाठी महावितरणने मोहीम हाती घेतली आहे. बिल न भरणाऱया ग्राहकांचे वीजजोड तोडण्यात येत आहेत. वीजतारांवर आकडे टाकून वीजचोरी करणाऱयांवरही महावितरणने कारवाई सुरू केली आहे.
जिल्ह्यात घरगुती ग्राहक 3 लाख 34 हजार 397, वाणिज्य ग्राहक 36 हजार 459, तर औद्योगिक 1148 ग्राहक आहेत. नियमित वीजजोडणी देण्याची मागणी केल्यास तातडीने वीजजोड देण्यात येईल. वीजजोडणी न घेता वीजचोरी करणाऱयांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी सांगितले.
कृषी ग्राहकांना 50 टक्के सूट
कृषी ग्राहकांनी वर्षभरात थकीत वीजबिल भरल्यास बिलाच्या रकमेत 50 टक्के सूट देण्यात येईल. ग्रामीण भागातील वीजग्राहकांकडून मिळणाऱया रकमेतील 33 टक्के रक्कम त्याच गावातील व परिसरातील विजेच्या समस्या सोडविण्यासाठी वापरली जाईल. आणखी 33 टक्के रक्कम पालकमंत्र्यांकडे दिली जाईल. त्यातून उपकेंद्रे व फिडरची कामे केली जातील. अशाप्रकारे 66 टक्के रक्कम ग्रामीण भागातच वापरली जाणार आहे. केवळ 34 टक्के रक्कमच महावितरणला मिळणार असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी सांगितले.
महावितरण कर्मचाऱयांकडून जीव मुठीत धरून दुरुस्तीचे काम
नगर शहरातील माळीवाडा आशा टॉकीज येथे असणाऱया वीज खांबावरील दुरुस्तीसाठी महावितरणच्या कर्मचाऱयाला आपल्या जीवावर उदार होऊन काम करीत असल्याचे पाहावयास मिळाले. यात वीज खांबावर तारांचा गुंता पाहावयास मिळाला. कर्मचाऱयाने कुठल्याही प्रकारचे रबरी हातमोजे, रबरी बूट न घालता काम करीत असल्याचे निदर्शनास आले.
सदर घटनेची माहिती घेतली असता एका व्यापाऱयाची वीज गेल्यामुळे दुरुस्ती केली जात असल्याची माहिती मिळाली. मागील महिन्यातच महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱयाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता. त्यामुळे महावितरणने कर्मचाऱयांच्या जीवाशी खेळणे सोडून योग्य ती सुरक्षितता पुरवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
थकबाकीची रक्कम
घरगुती ग्राहक - 86 कोटी 60 लाख 1 हजार
वाणिज्य ग्राहक - 25 कोटी 82 लाख 12 हजार
औद्योगिक ग्राहक - 12 कोटी 16 लाख 30 हजार