महाराष्ट्र
धार्मिक स्थळी जात आहात तर ही काळजी घ्या
By Admin
धार्मिक स्थळी जात आहात तर ही काळजी घ्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे उद्या, गुरुवारी (६ ऑक्टोबर) भाविकांसाठी खुली केली जाणार आहेत. मात्र, धार्मिक स्थळावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. त्याच अनुषंगाने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसोबतच धार्मिक स्थळासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमांचे पालन न केल्यास प्रशासनाकडून कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
धार्मिक स्थळी गेल्यानंतर मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे भाविकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय थुंकण्यास प्रतिबंध करण्यात आला असून याचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय धार्मिक स्थळी, प्रार्थना स्थळी येणाऱ्या सर्वांना आरोग्य सेतू अँपचा वापर करावा लागणार आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, कोमॉर्बिड आजाराने ग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला आणि दहा वर्षांखालील लहान मुळे यांनी घरीच राहण्याबाबतचा सल्ला संबंधित धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन करणाऱ्यांनी द्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय धार्मिक स्थळांच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर सॅनिटायझर व थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करणे, आजाराची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देणे, मास्क लावलेल्या व्यक्तीलाच धार्मिक स्थळात प्रवेश द्यावा, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जागृती करणे, भाविकांना प्रवेश देण्यासाठी निश्चित नियमावली ठरवणे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होईल अशा पद्धतीने नियोजन करणे, धार्मिक स्थळी प्रवेश करणाऱ्या भाविकांची हातपाय धुण्याची व्यवस्था करणे, परिसरामध्ये वारंवार साफसफाई व निर्जंतुकीकरण करणे, स्वच्छतागृह व खाद्यगृह या ठिकाणी गर्दींचे नियंत्रण करणे आदी नियमांचे पालन करण्याचेही प्रशासनाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
Tags :
792
10