कांदा ६० रुपयांवर
By Admin
कांदा ६० रुपयांवर
नगर- प्रतिनिधी
हळवी कांद्याचा (लाल कांदा) हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने बाजारात या कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कांदा महाग झाला असून, किरकोळ बाजारात तो ५० ते ६० रुपये किलोवर पोहोचला आहे.
पुणे, नाशिक, वाशी या महत्त्वाच्या बाजार आवारात पुणे जिल्हा, नगर जिल्ह्य़ातील श्रीगोंदा तसेच नाशिक परिसरातून हळवी कांद्याची आवक होते. हळवी कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, गरवी (उन्हाळी कांदा) कांद्याचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, ही आवक अल्प प्रमाणात असल्याने गेल्या आठवडय़ाभरापासून बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कांदादरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारात होणारी गरवी कांद्याची आवक कमी आहे, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.
सध्या घाऊक बाजारात दहा किलो कांद्याला ३०० ते ३४० रुपये असा दर मिळाला आहे. गेल्या वर्षी गरवी कांद्याचे उत्पादन उच्चांकी झाले होते. मात्र यंदा अवेळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. कांदा बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्याने लागवडीवर मोठा परिणाम झाला. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारात दररोज दीडशे ते दोनशे गाडय़ांमधून कांदा विक्रीस पाठवला जात होता. यंदा मार्केट यार्डातील घाऊक बाजारात साधारणपणे ७० ते ८० गाडय़ांचीच आवक होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत कांद्याची आवक चाळीस टक्क्यांनी कमी झाली आहे.
लासलगाव बाजारात आवक निम्म्यावर
नाशिक येथील लासलगाव बाजार समितीत साधारणपणे १५ हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. प्रतिक्विंटलचा दर सरासरी ३३०० रुपये आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजार आवारात साधारणपणे दररोज २५ ते ३० हजार क्िंवटल कांद्याची आवक होते. यंदा आवक निम्म्याने कमी झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे दर ५० ते ६० रुपयांदरम्यान आहेत.
मुंबई, ठाण्यातही आवक कमी
मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये नाशिक, पुणे तसेच वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतून कांद्याची आवक होत असते. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याच्या केवळ १०० गाडय़ा दाखल झाल्या. दोन आठवडय़ांपूर्वी बाजार समितीत १० हजार ५२६ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. या आठवडय़ात ८ हजार ३८५ क्विंटल कांदा बाजारात दाखल झाला. त्यात ४० टक्के जुना आणि ६० टक्के नवीन कांद्याचा समावेश आहे. या आठवडय़ात कांद्याची आवक ३० टक्क्यांनी घटल्याचे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतून सांगण्यात आले आहे. त्यामुळे घाऊक बाजारात ४० रुपये किलोपर्यंत विकला जाणारा कांदा किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
मार्चपर्यंत तेजीचा अंदाज
कांदा उत्पादक शेतक ऱ्यांनी गरवी कांद्याची लागवड केली असली तरी अवेळी झालेल्या पावसामुळे लागवडीचा हंगाम लांबणीवर पडला आहे. साधारणपणे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात गरवी कांद्याची आवक मोठय़ा प्रमाणावर सुरू होईल. त्यानंतर कांदा दरात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.