महाराष्ट्र
292
10
लाडक्या बैलाच्या मृत्यूनंतर दशक्रिया विधीसह केला तेराव्याचा विधी
By Admin
लाडक्या बैलाच्या मृत्यूनंतर दशक्रिया विधीसह केला तेराव्याचा विधी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
देशातील प्रत्येक धर्मातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कार आणि विधी करण्याचा रिवाज आहे. त्या-त्या रितीरिवाजानुसार हे सर्व विधी केले जातात. परंतु, प्राण्यांवरही आपल्या कुटुंबातील सदस्यच म्हणून प्रेम करणार्या एका पशुपालकाने आपल्या लाडक्या ‘भाग्या’ बैलावर अंत्यसंस्कार करुन दशक्रियासह तेरावा विधीही पूर्ण केला. या प्रकाराची आता सर्वत्र चर्चा होत आहे.
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील माळेगाव पठार गावांतर्गत असलेल्या धादवडवाडी येथील पशुपालक महादू मारुती खराटे या पशुपालकाकडे ‘भाग्या’ आणि ‘राजा’ ही बैलजोडी आहे. खराटे कुटुंबाच्या बिकट परिस्थितीत या बैलजोडीने संपूर्ण ताकदीने साथ दिल्याने आज हे कुटुंब प्रगतीपथावर आहे. यामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. याचबरोबर कुटुंबिय देखील आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच त्यांच्यावर प्रेम करत आहे. यामुळे सर्वांना त्यांचा लळा लागला आहे. अगदी लहान मुलांप्रमाणेच त्यांच्यावर प्रेम करुन लाड केले. बैलपोळ्याला आकर्षक सजावट करुन वाजत-गाजत मिरवणूक काढून त्यांना मान दिला जायचा. मात्र, नियतीने डाव साधून लाडक्या भाग्याला कुटुंबातून हिरावून नेले. गेल्या तेरा दिवसांपूर्वी भाग्याचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यानंतर त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दशक्रिया आणि तेरावा विधी देखील विधीवत केला. यानिमित्ताने मनोहर महाराज खराटे यांचे प्रवचन होते. त्यांनी प्रवचनातून ‘भूत दया गायी पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माजी’ उक्तीनुसार उपस्थितांचे प्रबोधन केले. त्यानंतर उपस्थित सर्वांना भोजन देण्यात आले. यावेळी सर्वजण भावूक होवून अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. या अनोख्या प्रेमापोटी केलेल्या विधींची सर्वदूर चर्चा होत आहे. याबाबत पशुपालक महादू खराटे म्हणाले, ‘माणसांप्रमाणे प्राणी देखील भक्कम साथ देतात, याची अनुभूती आम्हांला आली आहे. खराटे कुटुंबाच्या प्रगतीत लाडक्या ‘भाग्या’चा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. तो आमच्या कुटुंबातील लाडका सदस्य होता. त्याच्या प्रेमापोटीच हे सर्व विधी केले.’
Tags :

