पाथर्डी- पुरग्रस्ताच्या मदतीसाठी आ.मोनिका राजळे यांचा आंदोलनाचा इशारा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी व शेवगाव तालुक्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवडयात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयात जोरदार आतिवृष्टी झाली. शेती पिकांसह जमिनीचे, वीजेचे खांब, रस्ते, पुल बंधारे यांच्यासह जलसंधारणाच्या कामाचे मोठे नुकसान झाले. अनेक गावात पुरांचे पाणी घरात शिरल्याने बरीच घरे पडून धान्य, कपडे, भांडी व संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले. गाय, बैल, म्हशी, शेळ्या, मेंढया, कोंबडया पाण्यात वाहून गेल्या. त्यामुळे राज्य सरकारने कोकण व कोल्हापुर, सातारा या भागाच्या धर्तीवर खास बाब म्हणून पाथर्डी व शेवगाव तालुक्यासाठी तातडीने मदत जाहीर करून प्रत्यक्ष अनुदान वाटप सुरू करावे. अन्यथा अतिवृष्टी व पुरग्रस्त बाधित शेतकऱ्यांसह राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा आमदार मोनिका राजळे यांनी दिला आहे.
पाथर्डी शेवगाव विधानसभेच्या आमदार मोनिका राजळे यांनी याबाबत राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदन दिले आहे. प्रशासनाने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामे करून शासनाच्या विविध विभागाकडे अहवाल पाठवून सानुग्रह अनुदानाची मागणी केलेली आहे. राज्याचे मदत व पुर्नवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार,ग्रामविकास मंत्री व अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबई मंत्रालयात आमदार माेनिका राजळे यांनी समक्ष भेट घेऊन वस्तुस्थिती मांडून पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यासाठी मदत मिळण्याची मागणी केली आहे.