महाराष्ट्र
प्रामाणिक प्रयत्न हीच यशाची गुरुकिल्ली-राकेश अकोलकर, आयपीएस
By Admin
प्रामाणिक प्रयत्न हीच यशाची गुरुकिल्ली-राकेश अकोलकर, आयपीएस
पाथर्डी- प्रतिनिधी
मराठी माध्यमाचा न्यूनगंड न बाळगता सतत कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळविणे अश्यक्य नाही.
आपल्यामध्ये सतत प्रगल्भता विकासीत करून आवडीचे क्षेत्र निवडल्यास त्या ठिकाणीही काम करून समाजसेवेची संधी उपलब्ध होत असते. काही विद्यार्थी छोटे व्यवसाय करूनही यूपीएससी सारख्या कठीण परीक्षेत पास झाले आहेत. एमपीएससी किंवा यूपीएससी ची तयारी करत असताना निर्णय क्षमतेमध्ये अडचण आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांचे किंवा आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेताना संकोच बाळगू नका. वेळेचे व्यवस्थापन केल्यास व अनावश्यक गरजांबरोबरच आपली मित्रसंगती चांगली ठेवल्यास प्रामाणिक प्रयत्न करून आपले ध्येय साध्य करता येते किंबहुना प्रामाणिक प्रयत्न हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन नुकतेच संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आयपीएस पदावर निवड झालेले राकेश आकोलकर यांनी केले.
ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड तर व्यासपीठावर पाथर्डीचे उपनगराध्यक्ष नंदुशेठ शेळके हे होते. यावेळी प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, अशोक मरकड, प्रदिप मरकड, डॉ. अशोक कानडे, डॉ. बबन चौरे आदी उपस्थित होते. युपीएससी परीक्षेत राकेश अकोलकर देशात ४३२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन आयपीएस पदावर निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
अकोलकर पुढे म्हणाले, यश मिळवण्यासाठी मराठी शाळा किंवा इंग्रजी शाळा असा काही फरक नसून आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर पहिली ते दहावी पर्यंतचा अभ्यास हा पूर्णपणे तयारीने केला पाहिजे. कोणत्याही अडचणीचे भांडवल न करता प्रामाणिकपणे त्याला सामोरे गेले तर यश नक्की मिळते. आरोग्य आणि खेळाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिल्यास २५ टक्के अभ्यास त्यातूनच होतो. फक्त स्पर्धा परीक्षेचा विचार न करता आपल्या परिस्थिती व कुवतीनुसार आपण कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी प्रयत्नशील रहावे आणि यश संपादन करावे असे ते शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, सुत्रसंचालन डॉ. अशोक कानडे तर आभार डॉ. अभिमन्यू ढोरमारे यांनी मानले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जास्तीत जास्त प्रेरणा मिळावी, यासाठी पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने नेहमीच यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम केले जाते.
Tags :
8938
10