रस्त्यावर चालत्या कारने घेतला अचानक पेट
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर असलेल्या आशा टॉकीज चौक परिसरात शुक्रवारी सायंकाळी चालत्या चारचाकी वाहनाने अचानकपणे पेट घेतला. त्यामुळे परिसरात काही काळ चांगलीच धावपळ उडाली होती. मात्र नागरिकांनी तसेच महापालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने हालचाली करत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
गांधी मैदान येथून एक व्यक्ती आशा टॉकीज मार्गाने रेल्वेस्टेशन येथे कार घेवून जात होता. ही कार सीएनजी वर चालणारी होती. कार आशा टॉकीज चौक परिसरात आली असता चालत्या कारने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान दाखवत कार थांबवून खाली उतरला. कारच्या बोनेट मधून आगीचे आणि धुराचे लोट निघत होते. त्यामुळे परिसरात काही काळ चांगलीच धावपळ उडाली होती. तख्ती दरवाजा परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरातून पाणी आणून या पेटत्या कारवर फेकत आग विझवण्याचा प्रयत्न केला. कोणीतरी महापालिकेच्या अग्निशामक दलालाही फोन करून माहिती दिली. अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी व परिसरातील नागरिकांनी ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.