लाच घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या घरात 'इतकी' कोट्यावधी रूपयांची संपत्ती आढळली
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महापालिकेचा मुख्य लेखाधिकारी प्रवीण गोपाळराव मानकर (वय 52) यास ठेकेदाराचे बिल देण्याच्या बदल्यात 20 हजारांची लाच मागितल्यावरून नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. मानकर याच्या घराची झडती घेतली असता 11 लाख 50 हजारांची रोख रक्कम, 540 ग्रॅम सोन्याचे दागिने, दीड किलो चांदी आणि तीन फ्लॅटची कागदपत्रे अशी कोट्यावधी रूपयांची संपत्ती आढळली आहे. दरम्यान, मानकर याला लाचलुचपत विभागाने गुरूवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.तक्रारदार व त्यांचे मावसभाऊ यांनी ठेकेदार म्हणून महापालिकेच्या केलेल्या कामाची बिले मंजूर करून तक्रारदार यांना चेक अदा केलेच्या मोबदल्यात मानकर याने तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रूपयांची मागणी केली होती. लाच मागणी पडताळणीमध्ये मानकर याने तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपयांची मागणी करून 15 हजार रूपये स्विकारण्याची संमती दर्शवली. त्यानुसार बुधवारी लाचलुचपत विभागाने तोफखाना पोलीस ठाण्यात मानकर विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.मानकर याचे कुटुंबीय पुणे येथील फ्लॅट नंबर 102, फ्यांटसी, उत्तम टाऊन स्केप, विश्रांतवाडी येथे राहत आहेत. मानकर यास अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका पथकाने त्याच्या पुणे येथील घराची झडती घेतली. त्याच्या पत्नीकडे या रोख रक्कम, दागिने आणि फ्लॅटच्या कागदपत्रांबद्दल उत्पन्नाचा स्त्रोत विचारला असता, त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. ही रोख रक्कम, दागिने आणि फ्लॅटची कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत.