महाराष्ट्र
श्री साईबाबा विश्वस्त संस्थेच्या अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती! राजपत्राद्वारे पदसिद्ध सदस्यासह अकरा विश्वस्तांची नावे घोषित;
By Admin
श्री साईबाबा विश्वस्त संस्थेच्या अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती! राजपत्राद्वारे पदसिद्ध सदस्यासह अकरा विश्वस्तांची नावे घोषित;
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेत असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळ सदस्यांच्या नावांना अखेर कायदेशीर मान्यता प्राप्त झाली आहे. राज्य सरकारने राजपत्राद्वारे शिर्डी नगरपंचायतीच्या पदसिद्ध पदासह बारा विश्वस्तांची नावे जाहीर केली आहेत. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची संस्थानच्या अध्यक्षपदी तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेर वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुहास आहेर यांचाही विश्वस्त मंडळात समावेश आहे.
राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यापासूनच शिर्डीच्या जगप्रसिद्ध श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त निवडीचा विषय चर्चेत आहे. विश्वस्थांं शिवाय असलेल्या संस्थानचे कामकाज सध्या उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या देखरेखीखाली नियुक्त समिती पाहत आहे. त्यामुळे संस्थानच्या विश्वस्त मंडळाची निवड लवकरात लवकर व्हावी असाही दबाव सरकारवर होता. त्यातच न्यायालयाच्या आदेशान्वये निवड प्रक्रिया राबवावी लागल्याने त्यातही मोठा विलंब झाला. मध्यंतरी विश्वस्त मंडळातील काही नावांच्या याद्याही सामाजिक माध्यमातून चर्चेत आल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला होता. मात्र आता या सार्या गोष्टी भूतकाळात जमा झाल्या असून राज्य सरकारने राजपत्राद्वारा विश्वस्त मंडळाच्या नावांना अखेर कायदेशीर मान्यता दिली आहे.
सरकारने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात अध्यक्षपदाची धुरा कोपरगावचे राष्ट्रवादीचे तरुण आमदार आशुतोष काळे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. तर, उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट जगदीश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या विश्वस्त मंडळात बहुतेक पहिल्यांदाच संगमनेर तालुक्याला स्थान मिळाले असून संगमनेर वकील संघाचे अध्यक्ष, ऍडव्होकेट सुहास जनार्धन आहेर यांची संस्थानच्या विश्वस्तपदी निवड झाली आहे. त्यांच्यासोबतच श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राहता तालुक्यातील साकुरी येथील अविनाश आप्पासाहेब दंडवते, श्रीरामपूर येथील सचिन रंगराव गुजर, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या विश्वासातील मुंबई येथील राहुल नरेन कनाल, राहुरी येथील सुरेश गोरक्षनाथ वाबळे, जयवंतराव पुंडलिकराव जाधव, शिर्डीतील महेेंद्र गणपतराव शेळके व एकनाथ भागचंद गोंदकर आणि शिर्डी नगरपंचायतीचे अध्यक्ष अशा एकूण बारा जणांची नावे राज्य सरकारने आज राजपत्राद्वारे घोषीत केली आहे. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर जगप्रसिद्ध साईबाबांच्या विश्वस्त संस्थेला नवे मंडळ मिळाले आहे.
साईबाबा संस्थानच्या यंदाच्या विश्वस्त मंडळात संगमनेर तालुक्याला बहुधा पहिल्यांदाच स्थान मिळाले आहे. संगमनेर वकील संघाचे अध्यक्ष तथा संगमनेरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सुहास आहेर यांच्या माध्यमातून एकप्रकारे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा अप्रत्यक्षपणे संस्थानमध्ये प्रवेश झाला आहे. यापूर्वी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर विखे पाटील गटाचा वरचष्मा असतं. यावेळी मात्र त्याला फाटा देऊन विश्वस्त मंडळाची निवड करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळात निवड झाल्याबद्दल संगमनेरच्या सुहास आहेर यांचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, महानंद दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Tags :
6738
10