धक्कादायक- १३ वर्षाच्या मुलीचा लग्नानंतर छळ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
आईने, काका आणि मावशीने आपल्या १३ वर्षांच्या मुलीचा बालविवाह करून दिला. परंतु, विवाहानंतर मुलीवर सासरच्यांकडून अत्याचार करण्याची घटना उघडकीस आली आहे. नेवासे पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांच्या पाठपुराव्यानंतर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मंत्रिकावरही जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेवासा तालुक्यातील माळी चिंचोरा येथील २४ वर्षीय मुलाशी या अल्पवयीन मुलीचा विवाह करून देण्यात आला. सासरी आल्यावर या अल्पवयीन मुलीचा मोठ्या प्रमाणावर छळ केला जाऊ लागला. नवऱ्यासह सासू विविध कारणांनी मारहाण करत असल्याची तक्रार मुलीने दिली आहे. चार महिने नवऱ्याने इच्छा नसताना शारीरिक संबंधही ठेवले तर, कायम मारहाणसुद्धा केल्याचा आरोप या अल्पवयीन मुलीने केला आहे. चार महिन्यानंतर सदर मुलगी काम करत नाही. तिला बाहेरची बाधा झाली असल्याचे सांगत सासरच्यांनी तिला आईकडे आणून सोडले. या वेळी आईने तिला राहुरी तालुक्यातील एका मांत्रिकाकडे घेऊन जात, आघोरी उपचारसुद्धा केल्याचा आरोप मुलीने केला आहे. हे सर्व प्रकरण मुलीच्या आजोबांना समजल्यावर त्यांनी तत्काळ अंनिसच्या रंजना गवांदे यांना हकीकत सांगितली. अंनिसच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आले. गवांदे यांच्या पाठपुराव्यानंतर आणि अल्पवयीन मुलीच्या आजोबांच्या साथीने या मुलीच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, बाल लैंगिक अत्याचारांसोबतच इतरही अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.