महिला सुरक्षा रक्षकानं थेट वर्गात जाऊन प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर येथील १२ वीच्या पेपरफुटीनंतर आता पुण्यात देखील असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. १० वीच्या गणिताचा पेपर फुटला असून थेट वर्गात पेपर सुरू असतांना गणिताचा फोटो महिला सुरक्षा रक्षकाच्या मोबाइलमध्ये आढळला आहे.
परीक्षा केंद्रावर परवानगी नसतानाही हा फोटो काढल्याने सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बिबवेवाडी इथल्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात घडला.
मनीषा कांबळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. अहमदनगर येथे १२ वीचा गणिताचा पेपर फुटला. त्यांतर मुंबई पोलिसांचे गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत असतांना आणखी दोन पेपर फुटल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर आता पुण्यातील एका केंद्रांवर १० वीच्या गणिताचा पेपर फुटल्याचे पुढे आले आहे. बिबवेवाडी इथल्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात माहितीनुसार, १३ मार्चला गणित भाग एकचा पेपर होता.
यावेळी सुरक्षा रक्षक मनीषा कांबळे यांनी परीक्षा सुरू असताना थेट हॉलमध्ये जाऊन पेपरचे फोटो काढले. दरम्यान या सेंटरवर बुधवारी (दि. १५) बोर्डाचे एक पथक तपासणीसाठी विद्यालयात गेले. यावेळी ही सुरक्षा रक्षक महिलेच्या हालचाली पथकाला संशयित आढळल्या. या महिलेचा मोबाईल तपास पथकाने घेऊन तपासणी केली असता, त्यांच्या फोनमध्ये गणित भाग एक प्रश्न पत्रिकेचे फोटो दिसल्याने अधिकारीही चक्रावले.
यावेळी पथकाने तातडीने संबधित महिलेकडे चौकशी केली. मात्र, उडवाउडवीची उत्तर दिली. त्यामुळे पथकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दिल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.