शिक्षणातील विविध उपक्रम सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक-शिक्षणाधिकारी अशोक कडूस
शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची तिलोक जैन विद्यालयास सदिच्छा भेट
पाथर्डी प्रतिनिधी:
श्री तिलोक जैन विद्यालयात राबवले जाणारे शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी व्यक्त केले. सदिच्छा भेटीच्या निमित्ताने ते विद्यालयात आले होते.
यावेळी आनंद संगीत अकॅडमी मार्फत चालवले जाणारे संगीत वर्ग, संस्थे मार्फत विविध स्पर्धा परीक्षांना उपयुक्त ठरणारे फाउंडेशन कोर्स, अद्ययावत प्रयोगशाळा, बी. आय. एस. क्लब, विद्यालयाचा विज्ञान प्रदर्शनातील सहभाग, विद्यालयाचा स्वयंअध्ययन उपक्रम, अशा विविध उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली.
भौतिकशास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय असल्याने भौतिकशास्त्राच्या प्रयोग शाळेतील प्रात्यक्षिक चालू असलेल्या इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक कसे करावे या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय, सैनिक स्कूल निवड पूर्व परीक्षा, विविध अवांतर स्पर्धा परीक्षा, अवांतर सहशालेय उपक्रम, पीपीटी - व्हिडीओ निर्मिती, डिजिटल वर्गांची निर्मिती इ. बाबींबाबत प्राचार्य अशोक दौंड यांचेशी चर्चा करून मार्गदर्शन केले. विद्यालय राबवत असलेले सर्वच उपक्रम नावीन्यपूर्ण असल्याचे मत व्यक्त करून विद्यालयाच्या भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.