पाथर्डी- प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
एका प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कासारवाडी शिवारात शुक्रवारी उघडकीस आली. कृष्णा अशोक करजे (वय 25, रा. मठाचीवाडी, ता. शेवगाव) आणि नेवाशातील एका अल्पवयीन मुलीचा मृतांमध्ये समावेश आहे.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव-मिरी रस्त्यावर कासारवाडी शिवारात एका पडीक खोलीमध्ये या प्रेमी जोडप्याने छताला वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बारावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घरातून निघून गेली होती. कुटुंबातील नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. आज सकाळी मुलीचे वडील नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता, त्या ठिकाणी मुलीने आत्महत्या केल्याचे त्यांना समजले.
माहिती मिळाल्यानंतर पाथर्डी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कौशल्यराम निरंजन वाघ, पोलीस नाईक सचिन नवगिरे, राहुल तिकोणे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतले.