पाथर्डी- मुलीने प्रेमविवाह केला म्हणून जावयावर सुपारी देऊन खुनी हल्ला
By Admin
पाथर्डी- मुलीने प्रेमविवाह केला म्हणून जावयावर सुपारी देऊन खुनी हल्ला
अहमदनगर- प्रतिनिधी
भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांनी मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून नेवासे येथे नऊ जणांना बरोबर घेऊन जावयाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे मारहाण करण्यासाठी सुपारी देऊन खेडकर यांनी काही गुन्हेगार सोबत आणल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात ही घटना घडली आहे.
नेवासा महाविद्यालयात पहिल्या वर्गात शिकणारा विद्यार्थी बंटी उर्फ प्रशांत राजेंद्र वाघ यांचे व लातूरला बीएएमएसच्या पहिल्या वर्गात शिकणाऱ्या पाथर्डीतील ऋतुजा माणिक खेडकर यांचे प्रेम होते. घरच्यांनी आंतरजातीय विवाहाला विरोध केला होता.
त्याला न जुमानता ऋतुजा व बंटी यांनी एक मार्च रोजी विवाह केला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
प्रेमविवाह केलेल्या प्रशांत उर्फ बंटी राजेंद्र वाघ याने दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय जनता पक्षाचे पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर, हृषीकेश खेडकर, प्रदीप गायकवाड, बळीराम अर्जुन मिरगे, अमोल भीमराज कानोजे, शाहिद सय्यद, नारायण हरिभाऊ चव्हाण, तात्यासाहेब जगदाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक विजय करे यांनी त्वरित नेवाशातून जाणाऱ्या रस्त्यावर नाकेबंदी केली. तसेच स्वत: दुचाकीवर आरोपीचा पाठलाग केला. शेवगाव रस्त्यावर भानसहिवरा शिवारात तीन मोटारीसह सात जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी नेवासे पोलीस ठाण्यात बंटी उर्फ प्रशांत वाघ याने दिलेल्या फिर्यादीवरून दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय करे करीत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील भाजप नेत्यांबाबतीत अनेक घटना घडत आहेत. काल भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांचे निकटवर्तीय आणि पंढरपूर भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष विदूल पांडूरंग अधटराव यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली होती. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्ष विदूल अधटराव यांच्या घरावर पोलीस व सहाय्यक निबंधक यांनी धाड टाकली होती. अधटराव यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
स्थानिक पोलिसांच्या कारवाईत अधवटराव यांच्या घराच्या झडतीमध्ये एकूण 48 चेक, 9 हिशोब वहया, कोरा स्टॅम्प, चेकबुके, बॅकपासबुके सह रोख रक्कम 29 हजार 340 रूपये जप्त करण्यात आले आहे. दरम्यान अधवटराव यांच्याविरोधात अवैध्य सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित कारवाई करण्यात आली होती.