पाथर्डी- कानिफनाथांची समाधी असलेल्या मढी गावात पाच दिवस प्रवेश बंदी
By Admin
पाथर्डी- कानिफनाथांची समाधी असलेल्या मढी गावात पाच दिवस प्रवेश बंदी
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या यात्रेच्या मुख्य पाच दिवशी कानिफनाथ समाधी मंदिरासह गावामध्ये भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे .
यात्रेदरम्यान काठ्यांची मिरवणूक सुद्धा रद्द करण्यात आली असुन, होळीपासून परिसरात पोलिसांकडून ठिक-ठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार श्याम वाडकर यांनी दिली. महसूल, पोलीस व देवस्थान समितीच्या विश्वस्तांची संयुक्त बैठक तहसील कार्यालयात घेण्यात आली.
शासनाच्या निर्णयाकडे भाविक ग्रामस्थ व व्यवसायिक यांचे लक्ष लागले होते. मढी येथे होळीपासून गुढीपाडवा पर्यंत राज्य पातळीवरील प्रमुख यात्रा संपन्न होऊन यात्रेला संप्रदायासह मोठी ऐतिहासिक परंपरा आहे.
हजारो भाविक यात्रेसाठी देवाच्या काठ्या श्रद्धापूर्वक आणून त्याची वाजत गाजत मिरवणूक काढतात.
मढी यात्रेतील डफ व ढोलाचा आवाज सुद्धा वैशिष्टपूर्ण ठरून या काळात तालुक्यात यात्रेचे वाद्य वेगळीच वातावरण निर्मिती करतात.जात पंचायती, गाढवांच्या बाजारासह संपूर्ण यात्रा प्रशासनाने रद्द करून होळीपासून परिसरात पोलिसांकडून ठिक-ठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार आहे.
फेसबुकसह विविध समाजा माध्यमांच्या माध्यमातून यात्रा काळातील विशेष पूजा, विविध धार्मिक विधींचे थेट प्रक्षेपण होईल. असे आदेश प्रशासनाने देवस्थान समितीला दिले आहेत. यावेळी माहिती देताना वाडकर म्हणाले की, राज्यासह तेलंगणा, गुजरात, कर्नाटक राज्यातूनही यात्रेसाठी भाविकांची गर्दी होते.
साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच उत्सव व सोहळ्यावर निर्बंध लावले आहेत. मढी येथे होळीच्या दिवशी कैकाडी समाजाची मानाची काठी मंदिराच्या कळसाला भेटल्यानंतर यात्रेचा प्रारंभ होतो. यावर्षी यासाठी कुठलीही मिरवणूक न होता फक्त पाच समाजबांधवांना सकाळी मंदिरात प्रवेश दिला जाईल.
सायंकाळी गोपाळ समाजातील पाच मानणाऱ्यांना देवस्थान समितीतर्फे मानाच्या गोवऱ्या देऊन मानाची होळी पेटवली जाईल. अन्य भाविकांसह ग्रामस्थांना या ठिकाणी प्रवेश बंदी असेल.