स्त्री पुरुष भेदभाव न करता लिंगभाव समानता असणे आवश्यक- संतोष लांडगे, मुख्याधिकारी
By Admin
स्त्री पुरुष भेदभाव न करता लिंगभाव समानता असणे आवश्यक- संतोष लांडगे, मुख्याधिकारी
पाथर्डी - प्रतिनिधी
मुलगा आणि मुलगी दोन्ही समान आहेत.दोघांनाही कुटुंबापासून तर बाहेर समाजापर्यंत जीवन जगण्याचा समान अधिकार आहे.स्त्री-पुरुष भेदभाव न करता लिंगभाव समानता असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी केले.
दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान,ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार मार्फत “नयी चेतना पहल बदल की“ नावाची लिंग आधारित भेदभाव दूर करण्यासाठी राष्ट्रीय मोहीम सुरु केली आहे. मोहिमेची थीम लिंग आधारित हिंसा समाप्ती करणे अशी आहे.या दृष्टीने नगरपरिषद प्रशासन संचालनालयद्वारे शहर अभियान व्यवस्थापन कक्ष मार्फत “नयी चेतना,पहल बदल की“ कार्यशाळा नगरपरिषदेच्या सभागृहात शहर प्रकल्प अधिकारी तथा मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.कार्यशाळेत महिलासंबंधी शासनाच्या विविध यंत्रणाचे अधिकारी यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक राजेंद्र परदेशी,समुपदेशन केंद्राच्या स्वाती तिजोरे,सरकारी वकील पाखरे,प्रज्ञा शिरसाट,नगरपरिषदचे प्रशासकीय अधिकारी अय्यूब सय्यद,सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल कोळगे,समुदाय संघटक समिना शेख,सीएमआरसीचे व्यवस्थापक राहुल पाठक,सहयोगीनी स्मिता आगळे,अनिता काटकर यांच्यासह शहरातील शहरस्तर संघ, वस्तीस्तर संघ,बचतगटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना लांडगे म्हणाले की,महिला घराबाहेर पडल्यामुळे बचत गटांच्या माध्यमातून सुलभरीत्या कर्ज उपलब्ध झाले.या माध्यमातून छोट्या मोठ्या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नामुळे महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या. व कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण झाल्या.आगामी काळात देखील
शाश्वत स्वयंरोजगार निर्माण होऊन नागरी दारिद्रय निर्मूलन राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचा मुख्य उद्देश पूर्ण होईल.यासाठी देखील सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी शहरातील १८ बचत गटांना महाराष्ट्र बँकेमार्फत २८ लाख रुपये कर्ज वितरण करण्यात आले.तसेच सर्व बँकांमार्फत ३८ बचत गटांना ८९ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच नगरपरिषद मार्फत बचतगटांना लेखासंच किट वाटप करण्यात आले.त्यानंतर लिंगभाव समानता प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.