महाराष्ट्र
पाथर्डीत बसगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले;प्रवासी नागरिकांची गैरसोय
By Admin
पाथर्डीत बसगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले;प्रवासी नागरिकांची गैरसोय
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी आगारातील बसगाड्या वेळेवर सुटत नसल्याने प्रवासी हवालदिल झाले आहेत. तासनंतास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे .सध्या एसटी बससेवेचा चांगलाच बोजवारा उडाला आहे.
अनेक लांबपल्ल्याच्या बसगाड्या रद्द करण्याची वेळ एस. टी. महामंडळावर आली आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजेपासून अनेक बसगाड्या वेळेवर सुटल्या नाही, तर काही बसगाड्या गेल्या नसल्याने तासंतास प्रवाशांना नवीन आणि जुन्या बसस्थानकावर ताटकळत बसावं लागेल.
एसटीच्या चालक आणि वाहकांना बसेस उपलब्ध नसल्याने एसटी आगारात येऊन बसण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. सध्या एस.टी. आगारात गाड्यांची दयनीय अवस्था बनली आहे. पाथर्डी तालुक्यासारख्या मोठी बाजारपेठे असलेल्या ठिकाणांहून इतरत्र परगावी प्रवासी जातात. मात्र, एसटी बसगाड्या वेळेवर उपलब्ध होत नाहीत. दळणवळणाच्या प्रवासासाठी शहरापासून ते ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांपर्यंत एसटीने प्रवास होतो. आता याच प्रवासासाठी नागरिक व प्रवासी एस.टी.च्या कोलमडलेल्या वेळापत्रकाला आणि मिळणार्या प्रवासी सेवेला पूर्णतः वैतागून हतबल झाले आहेत.
पाथर्डी तालुका ग्रामीण भाग म्हणून परिचित आहे. या ठिकाणचे बहुतांश नागरिक एसटीने प्रवास करतात. दळणवळणासाठी एसटी बसचा एकमेव पर्याय प्रवाशांकडे आहे. त्यातच तालुक्याचा मुख्य दळणवळणाचा राष्ट्रीय महामार्ग कल्याण-निर्मल (विशाखापट्टणम) रस्त्याचे दुरवस्थेमुळे खासगी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पाथर्डी आगारातील एस. टी. बसेस जुन्या झाल्या असून, त्यांची देखभाल दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग वेळेवर मिळत नाही. त्याचा परिणाम वाहन दुरुस्तीवर होत आहे. सध्या पाथर्डी आगारात प्रासंगिक करारावर गाड्या परगावी जातात. तसेच अनेक गाड्यांच्या दुरुस्तीचे काम, गाड्यांचे सुट्टे भाग वेळेवर उपलब्ध होत नाहीत. बसेसची संख्या ही वाढवली पाहिजे, निम्म्याहून अधिक गाड्या स्क्रॅपमध्ये गेल्या असताना त्याच स्थितीत चालकांना प्रवाशांचा जीव धोक्यात घालून, रस्तावर वाहन चालवावे लागते. प्रवाशी घेऊन गेलेल्या काही बसेस मध्येच रस्त्यातवर बिघाड होऊन बंद पडत असल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे.
कोल्हापूर, मुंबई, कल्याण, नाशिक या मार्गावर चालणार्या बसचे किलोमीटर नऊ लाखांहून अधिक झाले आहे. त्यामुळे गाडीचा दर्जा पूर्णतः घसरला आहे, तरीही चालक अशा परिस्थितीत बसेस चालवतात. बसअभावी सध्या ग्रामीणच्या एसटी बसच्या बंद आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून एकही नवीन लाल परी पाथर्डी आगाराला मिळाली नाही. त्यामुळे पाथर्डी आगाराला बस द्याव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सध्या विद्यार्थ्यांची शाळा, तसेच लग्नसमारंभ सुरू आहेत. त्यामुळे पाथर्डी आगाराने बसगाड्यांचे योग्य नियोजन करून बसेस सोडाव्यात. पाथर्डी आगारातील नवीन गाड्या व वाहनांचे सुट्टे भाग वेळेत मिळण्याबाबत जिल्हा प्रशासन व परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार
-शिवशंकर राजळे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
वरिष्ठ पातळीवर नवीन वाहनांसाठी पाठपुरावा केला आहे. सध्या शैक्षणिक सहलीसाठी बसगाड्या गेल्याने अडचण निर्माण झाली आहे.
– आरिफ पटेल, पाथर्डी आगर व्यवस्थापक
Tags :
345719
10