चालक-मालक संघटनेकडून वृद्धेश्वर देवस्थानला तीन लाखांची मदत
पाथर्डी- प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र वृद्धेश्वर (ता. पाथर्डी) येथे येणाऱ्या भाविकांना २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी घाटशिरस येथील चालक-मालक संघटनेच्या वतीने भाविकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तीन लाख रुपयांचा धनादेश देवस्थान समितीकडे सुपुर्द केला आहे. सावरगाव (ता. आष्टी) येथील एका शेतकऱ्याने वृद्धेश्वर येथे येणाऱ्या भाविकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी विनामूल्य तीन गुंठे जमीन मोफत दिली. देवस्थान समितीच्या वतीने विहीर खोदण्यात आली. विहिरीत बाराही महिने अगदी मुबलक पाणी उपलब्ध असून, याच विहिरीतून लोखंडी पाइपद्वारे वृद्धेश्वर येथे पाणी नेले जाणार आहे.
दीड किलोमीटरपर्यंत लोखंडी पाइप वापरून हे पाणी वृद्धेश्वर येथील मंदिराच्या पाठीमागील बारवेत सोडले जाणार आहे. सरपंच गणेश पालवे, चालक-मालक संघटनेचे किशोर सातपुते, राम चोथे, विश्वस्त लक्ष्मण पाठक, आबासाहेब पाठक, जनार्दन पालवे, मुरली पालवे, स्वामी महाराज, भीमाजी पालवे उपस्थित होते.