महाराष्ट्र
देवराई-घाटशिरस रस्त्याचे काम निकृष्ट
By Admin
देवराई-घाटशिरस रस्त्याचे काम निकृष्ट
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी देवराई ते घाटशिरस रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण सुरू आहे. निकृष्ट पद्धतीने काम होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या कामासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर झाला आहे. परंतु, देवराईपासून घाटशिरसपर्यंत ठिकठिकाणी रस्त्यावरील खडी उघडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
श्री क्षेत्र वृद्धेश्वर, श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ येथे दर्शनासाठी जाणार्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हा रस्ता भाविकांना ये-जा करण्यासाठी सुरक्षित असावा, अशी भाविकांची अपेक्षा आहे.
बर्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी आमदार प्रसाद तनपुरे यांच्याकडून निधी मंजूर झाला. त्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले. साईड पट्ट्यासह रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणास सुरुवात झाली. परंतु खडीकरणानंतर काही दिवसांतच खडी वर आल्याने प्रवाशांसह भाविकांची मोठी कसरत सुरू आहे. ठिकठिकाणी डांबर टाकून अंथरलेली खडी उघडल्याने घाटशिरस ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
रस्ताकामाची चौकशी व्हावी
हा रस्ता घाटशिरस ग्रामस्थांसह वृद्धेश्वर, मायंबा गडाकडे जाणार्या भाविकांसाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे या रस्त्याचे काम दर्जाचे झाले पाहिजे लोकप्रतिनिधींनी या रस्त्याची क्वालिटी कंट्रोलकडून चौकशी करावी, अशी मागणी घाटशिरसचे सरपंच गणेश पालवे यांनी केली.
उपोषण करण्याचा इशारा
अधिकारी व ठेकेदारवर कोणाचाही वचक राहिला नसावा त्यामुळे ग्रामस्थांच्या व भाविकांच्या तक्रारीकडे डोळेझाक करीत देवराई ते घाटशिरस रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम समाधानकारक झाले नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा माजी सरपंच दादासाहेब चोथे यांनी दिला.
Tags :
214170
10