प्रजासत्ताक दिनाच्या प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने मुलीचा मृत्यू
नाशिक - प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे सालाबादप्रमाणे प्रजासत्ताक दिनी ग्राम पालिकेच्या ध्वजारोहणासाठी जात असताना सुरू असलेल्या प्रभात फेरी दरम्यान १५ वर्षीय मुलीला चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील जनता माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पूजा दादासाहेब वाघ वय १५ इयत्ता नववी हिचे दि २६ जानेवारी रोजी शाळेतील प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रम संपल्यानंतर सालाबाद प्रमाणे येथील ग्रामपालिकेच्या ध्वजारोहणासाठी जात असताना सुरू असलेल्या प्रभात फेरी दरम्यान वंदे मातरम भारत माता की जय या घोषणा देत असताना चक्कर येऊन पडल्याने तिला तातडीने बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले होते. पुजा हिची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप जायभार यांनी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले असता वाटेतच तीचे निधन झाले.