तृतीयपंथी ओळख दिनाच्या निमित्ताने मतदार नावनोंदणी सप्ताह
पाथर्डी- प्रतिनिधी
३१ मार्च हा आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्ताने अहमदनगर जिल्ह्यात २७ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत तृतीय पंथीयांचा मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह राबविण्याचा निर्णय जिल्हा निवडणूक विभागाने घेतला आहे.
या सप्ताहात तृतीयपंथी मतदारांची नोंदणी केली जाणार आहे. यासाठी पाथर्डीचे तहसीलदार शाम वाडकर यांनी तहसील कार्यालयामध्ये सुवर्णयुग तरुण मंडळ व इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती.
यावेळी निवडणुक शाखेचे नायब तहसिलदार संजय माळी, सुवर्णयुग तरूण मंडळाचे अध्यक्ष वैभव शेवाळे, दिलीप खांदाट, सोहेल शेख ,विनय बोरुडे आदी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार वाडकर म्हणाले की, लोकसंख्येतील पात्र सर्व तृतीयपंथी नागरिकांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्यामुळे तृतीय पंथी ओळख दिनाच्या निमित्ताने त्यांच्या नावनोंदणीसाठी प्रयत्न केल्यास ही लक्ष्यापूर्ती करण्यास हातभार लागू शकणार आहे. या मोहिमेद्वारे तृतीय पंथीयांची संख्या अधिक असणारी ठिकाणे यांचा शोध घेऊन,त्या ठिकाणी एकदिवशी तृतीयपंथी मतदार नावनोंदणीसाठी शिबिर आयोजित करू.
तसेच सप्ताहामध्ये तृतीयपंथी मतदार नावनोंदणीसाठी प्रामुख्याने प्रयत्न सर्वांनी करावे असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.