महाराष्ट्र
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर, अनेकांचे धाबे दणाणले
By Admin
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर, अनेकांचे धाबे दणाणले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झेडपीच्या 85 गटांसाठी तर त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती गणांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आल्या.
या आरक्षण सोडतीमध्ये काही खुशी तर काही गम अशी स्थिती होती. यामुळे निवडणुकीच्या कामाला लागलेल्यांची मोठी अडचण झाली आहे. यात देखील काहीचे नशिब खुलले असून गट आणि गणाची मोडतो होवून देखील त्यांचा गट सर्वासाधारणसाठी खुला राहिला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा आरक्षण अद्याप झालेले नसले तरी यंदा झेडपीत महिला राज राहणार आहे. 85 सदस्यापैकी आधीच 43 महिला सदस्यांसाठी गट आरक्षीत असून काही ठिकाणी खुल्या प्रवर्गातून देखील महिला निवडणूक लढविण्याच्या तयारी आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात महिलांची संख्या ही अधिक राहणार आहे.
अकोले तालुक्यात माजी सभापती आणि विद्यमान सदस्य कैलास वाकचौरे यांचा आधीचा धामणगाव आणि आताचा धुमाळवाडी गट आरक्षीत झाला आहे. विद्यमान सदस्य रमेश देशमुख यांचा देवठाण गट महिलेसाठी आरक्षीत झाला असून विद्यमान सदस्य जालींदर वाकचौरे यांचा गट महिलेसाठी आहे.
मात्र, याठिकाणी ते कन्येला संधी देणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. राजूर गटातून प्रतिनिधीत्व करणार्या सुनीता भांगारे यांचा आदिवसी भागातील गट ओबीसींसाठी आरक्षीत झाला आहे. यामुळे त्यांची अडचण झाली आहे.
संगमनेर तालुक्यात विद्यमान सदस्य अजय फटांगरे यांना संधी असून त्यांचा बोटा गट खुला झाला आहे. तर विद्यमान सदस्य सीताराम राऊत यांचा घुलेवाडी गट राखीव झाला आहे. सदस्य एस.एम. कातोरे यांचा गट महिलेसाठी राखीव झाला आहे. संगमनेर तालुक्यात यंदा काही नवीन तरूण चेहर्यांना देखील संधी राहणार आहे. कोपरगाव तालुक्यात विद्यमान सदस्य राजेश परजणे यांचा गट खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे.
यामुळे त्यांची अडचण झाली आहे. राहाता तालुक्यात पाचपैकी चार गट सर्वसाधारण महिलेसाठी असून एक गट हा सर्वसाधारण आहे. श्रीरामपूर तालुक्यात दत्तनगर ओबीसी महिलेसाठी राखीव झाल्याने बाबासाहेब दिघे यांची अडचण झाली आहे. बेलापूरमधून विद्यमान सदस्य शरद नवले यांची लॉटरी लागली आहे. हा गट ओबीसी राखीव झाल्याने नवले यांना पुन्हा याठिकाणी नशीब आजमावता येणार आहे.
नेवासा तालुक्यात सभापती सुनील गडाख यांची अडचण झाली असून त्यांच्यासाठी एकही गट शिल्लक नाही. आठपैकी सात गट महिलांसाठी राखीव असून एक गट अनुसूचित जमातीसाठी आहे.
यामुळे विठ्ठलराव लंघे यांची अडचण झाली आहे. त्यांना पुन्हा झेडपीसाठी पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे. शेवगावात घुले परिवाराला दहिगाव-ने हा सोयीचा असून तो देखील ओबीसाठी राखीव आहे. त्याठिकाणी अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी संधी आहे.
सर्वात लकी पाथर्डीकर असून सर्व गट सर्वसाधारण असून केवळ एका ठिकाणी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. नगर तालुक्यात सदस्य माधवराव लामखडे यांचा गट अनुसूचित जातीसाठी तर सदस्य शरद झोडगे यांचा गट ओबीसी महिलेसाठी, उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांचा गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे.
वाळकी आणि दरेवाडी हे सर्वसाधारण राहिल्याने माजी सदस्य बाळासाहेब हराळ यांचा राजकीय वनवास संपणार आहे. तर सदस्य संदेश कार्ले यांचा दरेवाडीतून पुन्हा झेडपीचा रस्ता खुला राहणार आहे.
राहुरी तालुक्यात वांबोरी आणि गुहा हे दोन गट सर्वसाधारणसाठी असून बारागाव नांदूर हा आरक्षीत झाल्याने विद्यमान सदस्य धनराज गाडे यांची अडचण झाली आहे. पारनेर तालुक्यात विद्यमान सदस्या सुप्रिया पाटील यांचा ढवळपुरी गट आरक्षीत झाला असून सभापती काशिनाथ दाते यांचा गट खुला राहिला आहे.
यामुळे त्यांना पुन्हा संधी आहे. कान्हूर पठार हा गट ओबीसी महिलेसाठी राखीव झाला असल्याने विद्यमान्य सदस्य उज्ज्वला ठुबे यांना संधी असून त्या भारतीय कम्युनिष्ठ पक्षाच्या एकमात्र सदस्या आहेत.
कर्जत तालुक्यात नव्याने तयार झालेला आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचा कोरेगाव गट आरक्षीत झाला आहे. तर माजी झेडपी सदस्य राजेंद्र गुंडचा कुळधरण गट सर्वसाधारण राहिल्याने गुंड यांना झेडपीची संधी राहणार आहे. जामखेड तालुक्यात फारशी राजकीय उलथापालथ होणार नाही. श्रीगोंदा तालुक्यात पिंपळगाव पिसा गट सर्वसाधारणसाठी असल्याने त्याठिकाणी माजी आ. राहुल जगताप परिवारातून झेडपीत सदस्य निवडून येवू शकतो.
मात्र, जगताप काय निर्णय घेतात याकडे तालुक्याचे लक्ष राहणार आहे. लिंपणगाव गट हा सर्वसाधारण असल्याने याठिकाणी सदस्य अनुराधाताई नागवडे यांना संधी राहणार आहेत. काष्टी गट खुला राहिल्याने याठिकाणी दिवंगत सदस्य पाचपुते यांच्या परिवारातील सदस्य यांना निवडणूक करता येणार आहेत.
भाजप नेते शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी चालविली होती. परंतु, जेऊर सर्वसाधारण महिलेसाठी व नागरदेवळे इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाल्याने अक्षय कर्डिले यांना दरेवाडी किंवा वाळकी गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे.
अन्यथा जेऊर किंवा नागरदेवळे गटातून सौभाग्यवतींना रिंगणात उतरवावे लागणार आहे. तर संगमनेर तालुक्यातील जार्वे गटातून तरूण चेहरा झेडपी येणार असल्याची चर्चा आहे.
Tags :
80204
10