महाराष्ट्र
औषधे पुरवणे ठेक्याच्या आमीषाने 31 लाख रुपयांची केली फसवणूक
By Admin
औषधे पुरवणे ठेक्याच्या आमीषाने 31 लाख रुपयांची केली फसवणूक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शासकीय रुग्णालयाला औषधे आणि वैद्यकिय उपकरणांचा पुरवठा करण्याचे काम मिळविण्याचे आमीष दाखवून औषध एजन्सी चालकाला 31 लाखांना फसविण्यात आले.
याप्रकरणी विजय साहेबराव ढेरे (रा. लोहगाव, ता. नेवासा), सचिन भाऊसाहेब गुलदगड (रा. गुलदगड मळा, राहुरी), पुष्पक एल. महालकर (रा. धावडे, पुणे), कांचन बराई (रा. धावडे, पुणे) या चौघांविरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश राजमल फिरोदिया (वय 31 रा. शिवगंगा टॉवर्स, सारसनगर, नगर. मूळ रा. दौला वडगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी फिरोदिया यांचे शहरातील जुना बाजार भागात सिटीप्राईड गेस्ट हाऊसमध्ये श्रीगणेश एजन्सी नावाचे औषधे विक्रीचे दुकान आहे व प्रकाश दरेकर (रा. निंबळक, ता. नगर) यांचे युवराज फार्मा हे दुकान आहे. व्यावसायाच्या अनुषंगाने फिर्यादी यांची त्यांच्याशी ओळख झाली होती. दरेकर याने 31 ऑगस्ट 2019 रोजी फोन करून कळविले की, औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात औषधे आणि वैद्यकीय उपकरणाची मोठी ऑर्डर आहे. डी.के.टी. फार्माचे रिझनल मॅनेजर विजय साहेबराव ढेरे व अतुल गवळी हे संंबंधित ऑर्डर आपल्या मिळवून देणार आहेत, असे सांगितले. त्याअनुषंगाने ढेरे यांच्यासमवेत या व्यवहाराच्या अनुषंगाने नगरला एका हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे
डी.के.टी. कंपनीचा माल पुणे येथील युनिव्हर्सल अॅण्ड तपाडिया एजन्सीमधून 13 सप्टेंबर ते 16 ऑक्टोंबर 2019 या कालावधीत वेळोवेळी 31 लाख 57 हजार 689 रुपयांची औषधे आणि वैद्यकीय उपकरणे खरेदी केले. ढेरे यांनी घाटी रुग्णालयासाठी माल खरेदी केला नाही. घाटी रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष खात्री केली असता, अशा स्वरूपाची औषधे आणि उपकरणांची आवश्यकता नसल्याचे समजले.
ढेरे याने हा माल खरेदी करण्यासाठी दुसरी पार्टी तयार असल्याचे सांगून सचिन भाऊसाहेब गुलदगड (रा. सुलक्ष्मी निवास, तनपुरेवाडी रस्ता, राहुरी), पुष्पक एल. महालकर (रा. धावडे, पुणे), कांचन बराई (रा. लक्ष्मी पार्क, कोंडवे, धावडे, पुणे) यांच्याशी ओळख करून दिली. त्यानुसार 6 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांना 31 लाख 57 हजार 689 रुपयांची औषधे आणि वैद्यकीय उपकरणे दिली. त्याबदल्यात दिलेला धनादेश बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने वटला नाही. त्यांच्याशी बिलाबद्दल वारंवार संपर्क केल्यावर… भावाने आत्महत्या केली, बाहेरगावी आहे, जीएसटीमुळे अडचण आहे, अशी कारणे सांगून रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर
31 लाख रुपये देणार नसल्याचे सांगू लागले. विजय ढेरे (रा. लोहगाव, ता. नेवासा), सचिन गुलदगड (रा. गुलदगडमळा, राहुरी), पुष्पक महालकर (रा. धावडे, पुणे), कांचन बराई (रा. धावडे, पुणे) या चौघांनी संगनमत करून कट कारस्थान रचून 31 लाख 57 हजार 689 रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दिल्याने या चौघांच्याविरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पुढील तपास करीत आहेत.
Tags :
561
10