महामारीप्रमाणेच रस्ते अपघात रोखण्यासाठीही नियमांचे काटेकोर पालन आवश्यक - डॉ. सुनिल पोखर्णा
अहमदनगर- प्रतिनिधी
कोविड काळात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकार्यांनी आरोग्य यंत्रणेला मोलाची साथ दिली आहे.रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलनेही कोविड काळात कोविड केअर सेंटर चालवून महामारीशी लढण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महामारीप्रमाणेच आपण रस्ते अपघात रोखण्यासाठीही सतर्क राहिले पाहिजे.यासाठी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन प्रत्येकाने केले पाहिजे.नियमांचे पालन करूनच आपण आपले स्वास्थ्य जपू शकतो,असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखर्णा यांनी केले. नगरमध्ये आयोजित रस्ते सुरक्षा अभियानाचा समारोप उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित मोफत नेत्रतपासणी व रक्तदान शिबिराने झाला.या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.पोखर्णा बोलत होते.कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील होते.
या शिबिरात डॉ.खणकर यांनी नेत्र तपासणी करून नेत्र आरोग्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रक्त संकलना साठी जनकल्याण रक्तपेढीच्या टिमने सहकार्य केले.दीपक पाटील म्हणाले की, यावर्षी रस्ते सुरक्षा अभियान संपूर्ण महिनाभर राबविण्यात आले.
यानिमित्त समारोपाला नेत्रतपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजना साठी रोटरी सेंट्रलने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. कोणतेही अभियान यशस्वी करण्यासाठी जनतेचा सहभाग आवश्यक असतो. रस्ते सुरक्षा ही निरंतर प्रक्रिया आहे. घराबाहेर पडल्यापासून प्रत्येकाने कायम काळजी घेतली पाहिजे. दुचाकीवर असताना हेल्मेट वापर, कारमध्ये असताना सिटबेल्ट वापरणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळला पाहिजे. आपण घेतलेली काळजी आपल्या कुटुंबियांसाठीही महत्त्वाची असते. कारण काळजी घेतल्यानेच आपण सुरक्षित राहू शकतो.वाहतूकीचे नियम हे कर्तव्य म्हणून पाळले पाहिजे,असे पाटील यांनी सांगितले.