गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे विकणारा अटकेत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गावठी पिस्तूल व जीवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन आलेला सराईत आरोपी महेश काशिनाथ काळे (वय २६, रा. जामगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
त्याच्याकडून चार गावठी पिस्तोल, आठ काडतुसे, दुचाकी, मोबाईल व सॅक असा दोन लाख २४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. शेंडी (ता. नगर) शिवारात पोलिसांनी ही कारवाई केली.
नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना जिल्ह्यातील अवैध गावठी पिस्तूल व हत्यारे बाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हत्यारे विकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात आले.
पांढरीपूल परिसरात गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस अंमलदार भाऊसाहेब काळे, संदीप पवार, सुनील चव्हाण, मनोज गोसावी, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, ज्ञानेश्वर शिंदे, आकाश काळे, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या.
या पथकाने शेंडी बाह्यवळण रस्ता तसेच पांढरीपूल परिसरात सापळा लावला. दुचाकीवरून आलेल्या संशयिताला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव महेश काळे असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, चार गावठी पिस्तोल, आठ काडतुसे मिळून आले. पोलिस अंमलदार संदीप पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात महेश काळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.