दोनदा विवाह-वर तोच अन् वधूही तीच, एकाच दिवशी झाला विवाह
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
तोच नवरदेव.. तीच नवरी.. विवाह मात्र दोनदा.. आणि तोही एकाच दिवशी. ऐकून आश्चर्य वाटले ना?
मात्र अहमदनगरमधील सागर आणि प्रियांका या नवदाम्पत्याच्या जीवनात हा अनोखा योगायोग जुळून आला.
एकाच दिवशी दोनदा संपन्न झालेल्या या विवाहाची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातील जळगाव येथील सागर वैराळ याचा कोपरगाव तालुक्यातील प्रियंका घारू हिच्याशी नुकताच विवाह पार पडला.
विवाहाचे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर वधू-वरांसह वर्हाडी मंडळी सायंकाळच्या सुमारास जळगाव येथे पोहचले.
वराकडून वरातीची जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी जळगावात रामकथेचा कार्यक्रम सुरू होता.
योगायोगाने त्याच दिवशी रामकथेतील सिता स्वयंवराच्या प्रसंगाचे निरूपण महाराज करत होते. सिता स्वयंवरात पुन्हा या नववधूवरांचा विवाह लावण्याची कल्पना गावकऱ्यांना सूचली.
गावकर्यांनी हा प्रस्ताव वरपित्यासमोर मांडला. हा प्रस्ताव ऐकल्यानंतर हर्षउल्हासित झालेल्या वर पित्याने वरात थांबवून तात्काळ गावकर्यांच्या प्रस्तावाला होकार दिला.
रामायणातील पात्राप्रमाणे, वर सागर आणि वधू प्रियंका यांना राम सितेप्रमाणे मुकूट परिधान करण्यात आला.
नंतर सुमधूर आवाजात मंगलअष्टके म्हणून हा विवाह पुन्हा एकदा संपन्न केला. हा विवाह पाहण्यासाठी संपूर्ण गाव उपस्थित होते.
अशा पध्दतीने एकाच दिवशी दोनदा विवाह करण्याचे भाग्य सागर आणि प्रियंका या वधूवरांना मिळाले. त्यामुळे या विवाह सोहळ्याची आता राज्यभरात चर्चा रंगू लागली आहे.