डंपरचालकाकडून लाच घेताना महसूल कर्मचाऱ्यांला पकडले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अवैधरीत्या वाळूची वाहतूक करताना पोलिसांनी पकडलेल्या डंपरचा अहवाल सादर करण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना तहसील कार्यालयातील महसूल सहायक हरेश्वर रोहिदास सानप (वय ३६) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
ही कारवाई आज बुधवारी (ता. २७) सायंकाळी चारच्या सुमारास शेवगाव तहसील कार्यालयासमोरील एका हॉटेलमध्ये झाली.
याबाबत मिळालेली माहिती अशी सन २०२० मध्ये शेवगाव पोलिस ठाण्यात वाळूचोरीबाबत गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी तक्रारदाराचा वाळूचा डंपर जप्त केला होता. हा डंपर अजूनही जप्त असल्याने तो मिळविण्याकरिता तक्रारदाराने न्यायालयात अर्ज केला होता. त्यावरून न्यायालयाने तहसीलदारांचा अहवाल मागविला होता. हा अहवाल तहसीलदारांकडून तक्रारदाराच्या बाजूने तयार करून देण्यासाठी एक लाख रुपये व घराच्या बांधकामासाठी एक डंपर वाळू, अशी मागणी आरोपीने केली होती. त्यातील पहिला टप्पा ५० हजार रुपये घेताना कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश महाजन, मनोज पाटील, उमेश पाटील आदींनी केली.
दरम्यान, या घटनेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार छगन वाघ यांनाही चौकशीसाठी शेवगावच्या शासकीय विश्रामगृहावर बोलाविले होते. आज झालेल्या या कारवाईमुळे बहुतांश शासकीय कार्यालयांत शुकशुकाट होता.
न्यायालयात तहसील कार्यालयाचे म्हणणे सादर करण्यासाठी जो अहवाल तयार करण्यात आला होता, त्यावर मी सुमारे तीन-चार दिवसांपूर्वी सही करून संबंधितांकडे दिला होता. त्यामुळे या प्रकरणात आपला काहीही संबंध नाही, असे तहसीलदार छगन वाघ म्हणाले.