महाराष्ट्र
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू
By Admin
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील गर्भगिरीच्या डोंगर रांगामधील हरीचा तांडा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीचे दोन महिन्यांच्या बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला आहे.
बछड्याच्या मृत्यूमुळे त्याची आई आक्रमक होवू शकते, यामुळे नागरिकांनी सावध रहावे, तसेच रात्री-अपरात्री काळजी घेण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांनी केले.
बछड्याच्या मृत्यूची माहिती मंगळवारी सकाळी वन विभागाच्या अधिकार्यांना ग्रामस्थांकडून कळाली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन मृत बछड्याला ताब्यात घेतले. यानंतर कायदेशीरबाबी पूर्ण करून या मृत बछड्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे, वनपाल राजेंद्र आल्हाट, विजय पालवे, नारायण दराडे, सुधाकर घोडके, बाळासाहेब मरकड आदींनी अंत्यविधी केला. या परिसरात सोमवारी रात्री 11 वाजेपर्यंत वन विभागाच्या अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी गस्त घातली होती. त्यावेळी ही घटना घडली नव्हती. मंगळवारी सकाळी पत्राच्या तांडाकडे जाणार्या डांबरी रस्त्यावर मृत बिबट्याचा बछडा आढळला. दोन महिन्यांच्या बछड्याला अज्ञात वाहनाने धडक दिली.
या धडकेत बिबट्याच्या बछडाचा जबड्यावरून वाहन गेल्याचे प्रथम दर्शनी वनविभागाच्या निदर्शनास आले. मृत बिबट्याच्या बछड्यामुळे या बिबट्याची आई हिंसक झाली असून, लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आल्या आहेत. परिसरातील नागरिकांची जागृती करण्यात आली आहे, अशी माहिती वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांनी दिली. चेकेवाडी येथील एका शेतकर्यांच्या शेळीवर बिबट्याने मंगळवारी हल्ला केल्याची घटना घडली. नागरिकामध्ये भीतीचे वातावरण आहे.
पिंजरा लावण्याची मागणी
पशुधनावर व माणसावरही हल्ला करू शकते या भीतीने नागरिक शेतामधे जाण्यास भीत आहेत. वनविभागाने येथे पिंजरा लावावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील ओव्हळ यांनी केली.
बिबट्याचा बछड्याच्या मृत्यूमुळे त्याची आई क्रोधीत होवू शकते. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना काळजी घ्यावी. घराच्या बाहेर झोपू नये. पशुधन उघड्यावर बांधू नये. रात्रीच्या वेळी घरासमोर पुरेसा उजेड असावा. लहान मुलांना एकटे सोडू नये. पशुधनाचे नुकसान झाल्यास अथवा बिबट दिसल्यास वनविभागाच्या अधिकार्यांशी संपर्क करावा.
– अरुण साबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पाथर्डी.
Tags :
795
10