महाराष्ट्र
खतांच्या विक्रीवर 'वॉच';गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाची विशेष मोहीम
By Admin
खतांच्या विक्रीवर 'वॉच';गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाची विशेष मोहीम
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामासाठी लागणारी खते मुबलक आहेत. तथापि, गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मागील दोन महिन्यांत जिल्ह्यातील एक हजार ३८६ दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये मोठ्या सात व इतर ३८ केंद्रांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात पाऊस सुरू असला, तरी अकोले तालुका वगळता इतर ठिकाणी अत्यल्प पाऊस आहे. पेरण्या वेगात आहेत; परंतु पाण्याची साठवण झाली नाही. खरिपासाठी आवश्यक असणारा खतसाठा जिल्ह्यात पुरेसा आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात ५३ हजार २७९ मेट्रिक टन खते शिल्लक आहेत. असे असले, तरी युरियाची मागणी वाढली आहे. त्यामुळे त्याच्या उपलब्धतेसाठी कृषी विभागाने तयारी केली आहे.
खतांचा काळा बाजार होऊ नये, जादा किमतीत खतांची विक्री होऊ नये, भेसळ होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्ह्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांना भेटी दिल्या आहेत. त्यातील अनियमितता आढळलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.
या कारणाने होते केंद्रांवर कारवाई
स्टॉक बुक उपलब्ध नसणे
किमतीचे फलक नसणे
जिल्हा परिषदेला अहवाल न देणे
अनधिकृत केंद्रे
खतांच्या उपलब्धतेची बिले नसणे
आवक-जावक रजिस्टर
जादा किमतीने खते विकणे
बनावट किंवा भेसळयुक्त खते आढळणे
खतांची मागणी
(कंसात मंजूर) (मे. टनांमध्ये)
युरिया - ११०८२३ (७९४४०)
एमओपी - १६८७८ (८७००)
एसएसपी - ३५४०१ (३७४१०)
डीएपी - २८३६८ (२५३८०)
संयुक्त खते - ८४०३५ (७४५७०)
एकूण - २७५५०५ (२२५५००)
खतांची विक्री व शिल्लक
युरिया - ३६०२४ (२३५५८)
एमओपी - ३८३४ (१५०२)
एसएसपी - १६४८७ (१३३४७)
डीएपी - ११४४८ (२८३४)
संयुक्त खते - ५०९९५ (१२०३८)
एकूण - १०८७८८ (५३२७९)
जिल्ह्यात खरिपासाठी आवश्यक असणारा खतसाठा पुरेसा आहे. युरियाची मागणी वाढत असली, तरी तो कमी पडणार नाही. खतांबाबत कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही, यासाठी केंद्रचालकांना ताकीद देण्यात आली आहे. काहींवर कारवाई केली आहे.
- शंकर किरवे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद
Tags :
46570
10