एस टी बस तिकिटाचे पैसे, मशिन घेऊन कंडक्टर पसार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पारनेर एसटी महामंडळाच्या आगारात कामाला असलेल्या एसटीच्या वाहकाने प्रवासी तिकिटाची जमा झालेली ३१ हजार ५९४ रुपयांची रक्कम, तसेच तिकीट काढण्यासाठी असलेल्या २४ हजार ४२० रुपयांच्या ईटीआयएम मशिन घेऊन पोबारा केला.
याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी मनोज विठ्ठल वैरागळ (रा. शांतिनगर, तारकपूर, नगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बसवाहकाचे नाव आहे. वैरागळ हा पारनेर आगारात वाहक म्हणून काम करतो. तो कामावर असताना १७ जुलै रोजी दिवसभराची प्रवासी वाहतूक तिकिटाची जमा झालेली ३१ हजार ५९४ रुपयांची रक्कम, तसेच २४ हजार ४२० रुपयांची तिकीट काढण्यासाठी वापरण्यात येणारी ईटीआयएम मशिन त्याने डेपोत जमा न करता ते घेऊन तो फरार झाला आहे.
गेल्या आठवडाभरात तो पुन्हा कामावर न आल्याने, तसेच तिकिटाची रक्कम व मशिन जमा न केल्याने अखेर मंगळवारी (ता. २६) पारनेर बस आगाराचे वाहतूक निरीक्षक रावसाहेब ताराचंद करपे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात वैरगळाविरुद्ध फिर्याद दिली. या फिर्यादीवरून वैरागळविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैरागळ याच्यावर फेब्रुवारी २०२२ मध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान नगर शहरात एसटी बसवर दगडफेक केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यातसुद्धा एक गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप तपास करत आहेत.