पाथर्डी-नगर रस्त्यावरील चांदबिबी महालाजवळ दुचाकीस्वारास लुटले;
लूटमार करणाऱ्याला शेवगाव तालुक्यातील 'या' गावातून अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर-पाथर्डी रस्त्यावरील चांदबिबी महालाजवळ मोटरसायकल स्वारास अडवून लूटमार करणार्या सचिन काते याला नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने सामनगाव (ता.शेवगाव) येथून अटक केली आहे.
सागर मधुकर डाके (वय 23, रा. कोरडगाव रोड, रामगिरबाबा टेकडी, पाथर्डी) हे 17 जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास नगर-पाथर्डी रस्त्याने दुचाकीवर गावाकडे जात होते. चांदबिबी महालाजवळ मागून दुचाकीवर आलेले दोघे त्यांना म्हणाले, 'तुमच्या गाडीचे हाप्ते थकले आहेत, मोटारसायकल थांबवा,' फिर्यादीने त्यांची मोटारसायकल थांबविली.
यावेळी सोनू कसबे (रा. कोरडगाव ता. पाथर्डी) व सचिन काते (रा. सामानगाव, ता. शेवगाव) यांनी फिर्यादीस 'तू जास्त माजला काय,' असे म्हणून हातातील काठी व लोखंडी पाईपने फिर्यादीच्या हातावर, चेहर्यावर मारले. तेव्हा आकाश दिनकर हा भांडणे सोडविण्यासाठी आला असता, त्यालाही दोघांनी मारहाण केली. फिर्यादीचे मामा गणेश दिनकर यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
सोनू कसबे याने त्यांचा मोबाईल फोडून त्यांच्याकडील एक लाख 20 हजारांची रोकड हिसकावून घेऊन पोबारा केला. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी तपास करून त्याला शेवगाव तालुक्यातून अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलिस उपनिरीक्षक रणजित मारग, पोलिस कर्मचारी विशाल टकले, संदीप जाधव, संभाजी बोराडे, धर्मराज पालवे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.