प्रभारी प्राचार्य व लिपिकास लाच घेताना पकडले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थिनीला पदवी प्रमाणपत्र आणि इंटर्नशीप केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी सुमारे दीड लाखांची लाच स्वीकारताना वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य आणि लिपिकाला अटक करण्यात आली. वडाळा महादेव (ता. श्रीरामपूर) येथील शिवा ट्रस्ट संचलित शरदचंद्रजी पवार होमिओपॅथीक मेडीकल कॉलेजमध्ये ही घटना घडली. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
झोडेगाव (ता.गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील एक मुलगी या महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिला पदवीचे प्रमाणपत्र देण्यासाठी जवळपास सुमारे दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. तिच्या वडिलांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १० ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक दिपक करांडे यांच्यासह कर्मचारी संतोष शिंदे, रमेश चौधरी, रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, संध्या म्हस्के, हारुन शेख, राहुल डोळसे आदींनी सापळा लावला होता. आज, गुरुवारी तक्रारदाराने रक्कम देण्याचे निश्चित केले. प्रभारी प्राचार्य बापुसाहेब हरिश्चंद्रे ( वय ५२ वर्ष, रा. मानोरी, ता-राहुरी) व लिपिक भारती इथापे (वय ३४, रा. निपाणी वडगांव, ता. श्रीरामपूर) यांना ही लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.