महाराष्ट्र
28967
10
ऊसतोडणी कामगारांपर्यंत शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना पोहोचाव्यात-
By Admin
ऊसतोडणी कामगारांपर्यंत शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना पोहोचाव्यात-डॉ. शिवाजी हुसे
पाथर्डी- प्रतिनिधी
ऊसतोडणी आणि साखरेचे उत्पादन यामधील ऊसतोड कामगारांची भूमिका महत्त्वाची असून या कामगारांमुळेच साखर कारखानदारी आज एका उंचीवर पोहचू शकली. साखर कारखानदारी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत असतांना, ऊसतोड कामगारांची आर्थिक स्थिती मात्र सुधारलेली नाही. ऊसतोड कामगारांचे जगणे म्हणजे विंचवाचे बिऱ्हाड. ऊसतोड कामगारांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न व्हावेत. कामाच्या ठिकाणी संपूर्ण कुटुंब घेऊन जाणाऱ्या या घटकांपर्यंत शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना पोहचाव्यात, अशी अपेक्षा त्रैमासिक तिफण चे संपादक डॉ. शिवाजी हुसे यांनी व्यक्त केली.
ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात त्रैमासिक तिफण, भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी साहित्यातील ऊसतोड कामगारांचे चित्रण या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड तर व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार व मुकादम संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदिप सांगळे, अमरावतीचे पोलीस अधिक्षक डॉ. दत्तात्रय राठोड, साहित्यिक डॉ. कैलास दौंड, डॉ. सोमीनाथ घोळवे, डॉ. सूर्यकांत नेटके, डॉ. दिलीप बिरुटे, मराठी विभागप्रमुख डॉ. सुभाष शेकडे उपस्थित होते.
गहिनीनाथ थोरे यांनी यावेळी ऊसतोड कामगार व मुकादमांसाठी उभारलेल्या लढ्यांविषयी माहिती दिली. शासनासोबत वेळोवेळी करार करून त्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यात थोरे यांनी महत्वाची भूमिका बजावली. ऊसतोड कामगारांना असंघटित कामगारांचा दर्जा न देता त्यांना संघटित कामगार श्रेणीत आणून शासनाने व साखर कारखानदारांनी त्यांना आर्थिक कवच प्रदान करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बीजभाषक डॉ. कैलास दौंड यांनी मराठी भाषेत ऊसतोडणी कामगारांवर लिहिण्यात आलेल्या साहित्याचा उहापोह आपल्या व्याख्यानात केला. कोयता, पाचट, कुणाच्या खांद्यावर, रिक्त अतिरिक्त, आदी कादंबरीतील ऊसतोड कामगारांचे चित्रण त्यांनी यावेळी कथन केले. डॉ. सुभाष शेकडे लिखित हाणला कोयता झालो मास्तर या आत्मचरित्राचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. पूर्ण महाराष्ट्राला सर्वात जास्त ऊसतोड कामगार पुरविणारा तालुका म्हणून पाथर्डीची ओळख होती. परंतु हे चित्र हळूहळू बदलत असून या बदलामध्ये सर्वात जास्त योगदान शिक्षणमहर्षी मा. आमदार बाबुजी आव्हाड यांचे होत. पाथर्डी हा आता ऊसतोड कामगारांचा तालुका न राहता नोकरदारांचा तालूका म्हणून पुढे येत आहे, असे ते शेवटी म्हणाले. यावेळी डॉ. संदिप सांगळे, डॉ. अर्जुन चितळे व डॉ. दत्तात्रय राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तिफण ऊसतोड कामगार विशेषांकाचे व डॉ. कैलास दौंड लिखित आई मी पुस्तक होईन या बालकविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, सूत्रसंचालन डॉ. अर्जुन केरकळ व डॉ. अशोक डोळस तर आभार डॉ. सुभाष शेकडे यांनी मानले.
Tags :
28967
10





