पाथर्डी-करंजी घाटात धक्कादायक घटना;जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
नगर सिटीझन liveटिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट सुरू होताच घाटाच्या दुसर्या वळणाच्या संरक्षण कठड्याचा लागून पूर्ण जळालेल्या अवस्थेत बुधवारी (दि.8) दुपारी एक मृतदेह पोलिसांना आढळून आला.
यापूर्वीही अनेक मृतदेह करंजीच्या घाटात आढळून आले आहेत. यामुळे करंजीघाट प्रेताची विल्हेवाट लावण्याचे ठिकाण बनतेय अशीच परिस्थिती काही दिवसांपासून निर्माण झाली आहे.
नगर-पाथर्डी महामार्गावर करंजीचा अवघड घाट लागतो. नगरकडून येताना घाट सुरू झाल्यानंतर दुसर्याच वळणाच्या पारपिटाच्या आडोशाला एका अज्ञात मृतदेह पूर्ण जळालेल्या अवस्थेत आढळून आला.
काही हाडे शिल्लक होती. अतिशय मोजकेच अवशेष राहिल्याने हा मृतदेह पुरुषाचा की, महिलेचा याचा अंदाज लावणे पोलिसांच्या दृष्टीने कठीण झाले आहे. मृतदेह पूर्ण जाळून टाकल्याने आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या मृतदेहाच्या कवटीवरून व अवयवांवर हा मृतदेह महिला किंवा तरुणीचा असावा, असा अंदाज येणारे-जाणारे बांधत होते. या घाटाच्यावर हनुमान मंदिरानजीक मराठवाड्याची हद्द लागते. तर, दुसर्या बाजुने नगर तालुक्याची हद्द सुरू होते. या हद्दीचा फायदा गुन्हेगार घेतात. गेल्या काही दिवसांपासून या घाटात मृतदेह सापडण्याची मालिकाच सुरू झाली आहे. पोलिस उपाधीक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे विभागाचे पोलिस
निरीक्षक अनिल कटके, पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, पोलिस कर्मचारी हरिभाऊ दळवी, सतीष खोमणे, रामदास सोनवणे, राहुल त्रिकोणे, नीलेश म्हस्के आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.