मतदारांनी धर्मनिरपेक्ष मतदान करून लोकशाही मजबूत करावी- प्रांताधिकारी प्रसाद मते
श्री तिलोक जैन विद्यालयात संकल्प दिन उत्साहात
पाथर्डी प्रतिनिधी:
श्री तिलोक जैन विद्यालयात मतदान जनजागृती मोहिमेअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. मतदार जागृती अभियानाच्या अनुषंगाने ३ एप्रिल रोजी संकल्प दिन साजरा करण्यात आला.
विद्यालयात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आई-वडिलांनी तसेच घरातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा अधिकार वापरून मतदान करावे, असे संकल्प पत्र स्वस्ताक्षरात लिहून जमा केले. कोणत्याही आमिषाला बळी न पडता निकोप वातावरणात पात्र मतदारांनी धर्मनिरपेक्ष भावनेने मतदान करावे आणि लोकशाही मजबूत करावी, असे आवाहन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी याप्रसंगी केले.
विद्यार्थी हे उद्याचे भावी आधारस्तंभ असून आपल्या आई-वडिलांना मतदान करण्यासंदर्भात केलेला संकल्प वाखाणण्याजोगा आहे, असे मत तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी व्यक्त केले.
यावेळी मतदान जनजागृती व्हावी यासाठी मै भारत हू, ये पुढे...मतदान कर लोकशाहीचा सन्मान कर... यासारख्या निवडणूक गीतांचा आणि मतदार साक्षरता गीतांचा कार्यक्रम स्वीप समितीचे सदस्य भारत गाडेकर, बिपिन खंडागळे, सचिन साळवे, राजेंद्र चव्हाण यांनी सादर केला . त्याचप्रमाणे मतदान जागृतीच्या संदर्भात सुनील खेडकर आणि कमलेश केदार यांनी घोषणा देऊन कार्यक्रमात रंगत आणली.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी अनिल भवार, स्वीप चे नोडल अधिकारी तथा शिक्षणाविस्तार अधिकारी रामनाथ कराड, अजय भंडारी, महेंद्र राजगुरू, आजिनाथ पालवे, दीपक बांगर, निलेश फुंदे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल पानखडे यांनी केले तर सर्व मान्यवरांचे आभार विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड यांनी मानले.