महाराष्ट्र
रेशनिंगचा पावणेदोन लाखांचा तांदूळ पकडला
By Admin
रेशनिंगचा पावणेदोन लाखांचा तांदूळ पकडला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगर-औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपूल मार्गे शेवगावकडे मालट्रकमधून नेण्यात येणारा सुमारे पावणेदोन लाख रूपयांचा रेशनिंगचा तांदूळ खोसपुरी शिवारात पकडण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची ही कारवाई करीत मालट्रकसह पावणेसात लाख रूपयांचा मुद्दमाल हस्तगत केला आहे. शेवगावकडून पांढरीपुलाकडे ट्रकमधून (क्र.एमएच 17 बीवाय 5960) रेशनिंगचा तांदूळ काळाबाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारा कडून मिळाली.
त्यांनी याबाबत खात्री करून कार्यवाही करण्याचे आदेश पथकाला दिले. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, हेडकॉन्स्टेबल विजयकुमार बेठेकर, बापूसाहेब फोलाणे, पोलिस नाईक शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, सचिन अडबल, संतोष लोढे, कॉन्स्टेबल जालिंदर माने, चालक हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत कुसळकर यांचे पथक कारवाईसाठी रवाना झाले.
पथकाला रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हा ट्रक येताना दिसला. ट्रक थांबविल्यानंतर केबिनमध्ये ट्रक चालक फारूक फकीर मंहमद शेख (वय 30, रा. खरवंडी, ता. नेवासा) व बाजूला कांतीलाल झुंबरलाल भंडारी ( 54, रा. खरवंडी ता. नेवासा,) बसलेले दिसले.त्यांच्याकडे विचारणा केली असता ट्रकमध्ये तांदूळ असल्याचे त्यांनी सांगितले. पथकाने पाहणी केल्यानंतर ट्रकमध्ये पांढर्या रंगाच्या 210 गोण्यांमध्ये शासकीय स्वस्त वितरण योजनेतील तांदूळ असल्याचे निदर्शनास आले.
सदर तांदळाचे बिलाबाबत विचारपूस करता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. भंडारी यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आपण ट्रकचे मालक असून, ट्रकमध्ये असलेल्या तांदळाच्या गोण्या मुकेश बोरा (रा. बदलेवली, ता. शेवगाव) यांच्या दुकानातून भरला असून, तो रेशनिंगचा असल्याचे सांगून दुसर्या गोण्यांमध्ये भरून विक्रीसाठी घेऊन चालल्याचे सांगितले.
त्यांच्याकडे सदर तांदळाचे कोणत्याही प्रकारचे बिल आढळून न आल्याने, पोलिस पथकाने 1 लाख 73 हजार 250 रूपये किमतीचा तांदूळ व 5 लाख रूपये किमतीचा ट्रक असा एकूण 6 लाख 73 हजार 250 रूपयांचा मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेतला. याप्रकरणी फारूक शेख, कांतीलाल भंडारी व मुकेश बोरा यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 भादंवि कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुरवठा विभागाला माहिती देण्यात आली आहे.
Tags :
41559
10