बोअरवेलमधून आलं इतकं पाणी की मोटर शंभर फूट उंच हवेत उडाली
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अनेकदा अशा काही घटना समोर येतात ज्या काही वेळातच परिसरात चर्चेचा विषय ठरतात. या घटना सगळ्यांनाच आश्चर्यचकित करतात आणि बघता बघता त्या व्हायरलही होतात.अशीच एक अजब घटना आता अहमदनगरमधून समोर आली आहे. यात एका बोअरवेलच्या कामावेळी असं काही घडलं, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती.अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव इथे ही घटना घडली. यात एका घराजवळ बोअरवेल मारत असताना असं काही घडलं, जे पाहून कोणीही थक्क होईल. बोअरवेल मारत असताना तिथूनच 150 फुटावर असलेल्या एका बोअरमधील पाणी बाहेर येऊ लागलं. या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की बोअरवेलमध्ये टाकलेली मोटर पाण्यासोबत थेट हवेत उडू लागली पाण्याच्या प्रचंड वेगामुळे ही मोटर शंभर फूट उंच उडून शेजारी असलेल्या एका घरावर जाऊन पडली. सुदैवाने यावेळी घरामध्ये कोणी नव्हतं. त्यामुळे, जीवितहानी टळली आहे. मात्र, या अजब घटनेमुळे परिसरात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, की बोअरवेलमध्ये पाणी इतक्या जोरात बाहेर येतं की आधी त्याच्यासोबत पाईपही वरती उडू लागतो. यानंतर हा वेग आणखीच वाढतो अन् मग मोटरही हवेत उडते. हवेत शंभर फूट उंच उडून ही मोटर शेजारी असलेल्या घरावर जाऊन पडते. हा व्हिडिओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत. ही अजब घटना सगळ्यांनाच आश्चर्यचकित करत आहे.