कोरोनाचा वाढता आलेख, बीड जिल्ह्यात मृत करोना रुग्णांवर सामुहिक अंत्यसंस्कार
नगर सिटीझन live टिम-
शहर व परिसरात मंगळवारी (ता.सहा) रोजी १६१ नागरिक पॉझिटिव्ह निघाले. दररोज करोना रुग्णसंख्या वाढत आहे. तसेच अनेक वयस्कर नागरिकांचा मृत्यू होत आहे. मंगळवारी मांडवा मार्गावरील पालिकेच्या स्मशानभूमित आठ मृत करोना रुग्णांवर एकाच सरणावर सामुहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये दररोज शंभरच्या पुढे पॉझिटिव्हचा आकडा वाढत आहे. रुग्णांचा मृत्यूचा दर देखील वाढत आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड केअर सेंटरमधील सात व लोखंडी सावरगावच्या कोविड केअर सेंटरमधील एक अशा एकूण आठ मृत करोना रुग्णांवर नगरपालिका प्रशासनाने मांडवा रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर सामुहिक अग्नि दिला.
उपचार घेणाऱ्या करोना रुग्णांचा मृत्यू दर दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे कोविड केअर सेंटर व लोखंडी सावरगावच्या कोविड केअर सेंटरमध्ये केज, धारूर, गंगाखेड, परळी 'माजलगाव, सोनपेठ या तालुक्यातील नागरिक कोरोनावरील उपचारासाठी येथे येतात. त्यातील अनेक रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार पूर्वीपासून असतात. ते रुग्ण वयस्कर असल्याने त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते. काही रुग्ण आजारांकडे दुर्लक्ष करतात. रोग जास्त झाल्यानंतरच रुग्णालयात उपचारासाठी येतात. त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढत आहे.
तालुक्यात चार दिवसामध्ये पाचशेपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. स्थानिक नागरिक मात्र अद्यापही काळजी घेत नाहीत. अंबाजोगाई हे करोनाचे आगार बनले आहे. सोमवारी (ता.पाच) शहरातील भटगल्ली, मंगळवार पेठ, नागझरी, बोरखेड (परळी), लोखणी दावारागाव, अंबलटेक, आपेगाव, मंगरूळ (माजलगाव) व धारूर या गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा सोमवारी मृत्यू झाला.त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी मांडवा पठाण मार्गावरील नगर पालिकच्या स्मशानभुमित सामुहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.