शेवगाव तालुक्यातील नदी पात्रातील अवैध वाळू उपसा थांबविण्याची 'या' समितीची मागणी
जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेदन देऊन मागणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने शेवगाव तालुक्यातील नदी पात्रातील अवैध वाळू उपसाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोजमाप करुन संबंधितांवर दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी केली आहे.
खासगी एजंटामार्फत वाळू तस्करांकडून हप्ता वसुली सुरु असल्याचा आरोप करुन, अवैध वाळू उपसा त्वरीत न थांबल्यास नदीपात्रात स्थानिक शेतकर्यांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेवगाव तालुक्यातील भगूर, ढोरजळगाव, वरुर, खरडगाव, वडुले, मुंगी नदीपात्रात खासगी एजंटच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे अवैध वाळू उपसा सुरु आहे. खासगी एजंटामार्फत शेवगाव तहसील कार्यालयाची वसुली वाळू माफियांकडून सुरु असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अवैध वाळू उपसाने शेतकर्यांचे नुकसान होत असून, पर्यावरणाचा र्हास होत आहे. वाळू वाहतूकीने रस्ते खराब झाले आहेत. तर भरधाव वेगाने वाळू वाहतुक करणार्या वाहनांमुळे अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.शेवगाव तालुक्यातील भगूर, ढोरजळगाव, वरुर, खरडगाव, वडुले, मुंगी नदीपात्रात सुरु असलेल्या वाळू उपसाचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मोजमाप करुन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करुन, गुन्हे दाखल करावे, खासगी एजंटाकडून सुरु असलेली हप्ते वसुली थांबविण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.