महाराष्ट्र
शेवगाव तालुक्यास अवघी दीड लाख भरपाई, पूरग्रस्तांच्या पदरी निराशाच
By Admin
शेवगाव तालुक्यास अवघी दीड लाख भरपाई, पूरग्रस्तांच्या पदरी निराशाच
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यास फक्त दीड लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली असून पूरग्रस्त शेतकर्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. शेवगाव तालुक्यात जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने नुकसानग्रस्त पिकांचे अनुदान वाटप शासनाने सुरू केले आहे.
शेवगाव तालुक्यात फक्त 1 लाख 43 हजार 100 रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. मडके गावातील 17 शेतकर्यांच्या 3.65 हेक्टर पिकास 98 हजार 550 रुपये, तर खडके गावातील 6 शेतकर्यांच्या 1.65 हेक्टर पिकास 44 हजार 550 असे 23 शेतकर्यांना 5.30 हेक्टर बाधित पिकास हे अनुदान वाटप केले आहे. काही मंडळांत अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले, तर काही भागात कमी पावसाने पिकांचे उत्पन्न घटणार आहे. येथील पीक शंभर नंबरी असल्याचा अहवाल कृषी खात्याने दिला असल्याची माहिती आहे.
शासन नुकसानग्रस्त पिकांचे अनुदान देत आहे. त्यातच गतवर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुराने नदीकाठच्या 12 गांवात नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत दिली जाईल, अशी अपेक्षा होती. जवळपास 7 कोटी रुपये मदतीचा अहवाल वर्षापूर्वी शासन दरबारी सादर झाला आहे. मात्र कोणतेच सरकार त्यावर विचार करताना दिसून येत नाही. नदीच्या पुरात दावणीची जनांवरे, संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. घरांची पडझड झाली, पिकांसह शेतातील माती वाहून गेली.
या नुकसानीतून काही शेतकरी अद्याप सावरले नाहीत. आज ना उद्या मदत मिळेल, या अपेक्षेवर त्यांनी धीर धरला आहे. मात्र, शासनाला त्यांची दया येत नाही, हे दुर्देव आहे. यंदा जून महिन्यापासून हलका पाऊस होत आहे. अधुन-मधून मध्यम सरी झाल्या. अनेक भागात जोरदार पाऊस पाहण्याचे पारणेच फिटले नाही. सतत होणार्या हवामान बदलाने पिकांवर रोगराई होत राहिली. त्यासाठी औषध फवारणी करताना शेतकर्यांची दमछाक झाली. तालुक्यात पावसाची 563 मि. मी. सरासरी आहे, मात्र चार महिन्यात 488 मि. मी. एवढाच पाऊस झाला आहे. शेतांच्या बांधात पावसाचे पाणी साचले नाही, की नदी नाले वाहिले नाहीत. त्यामुळे विहीर, बोअरला पाणी वाढणार नसल्याने उसासह पुढील पिके धोक्यात येण्याची भिती व्यक्त होत आहे.
Tags :
3902
10