नागरीकांनी पाथर्डी नगरपालिकेला दिली 'ही' अनोखी भेट!
पाथर्डी- प्रतिनिधी
आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला एखाद्या आनंदाच्या क्षणाची आठवण रहावी, यासाठी त्या व्यक्तीची आवडणारी वस्तू भेट देतो. मात्र पाथर्डी नगरपालिकेला नागरिकांनी एक अनोखी भेट दिली आहे.
पाथर्डी शहरात सार्वजनिक मुतारी असावी, यासाठी मुकुंद गर्जे व अमोल गर्जे यांनी नगरपालिके विरोधात उपोषण केले होते. त्यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व अध्यक्ष यांनी आठ दिवसात शहरातील मुतारीचे काम सुरू होईल असे आश्वासन दिले होते.
मात्र दोन महिने उलटूनही मुतारीचे काम सुरू झाले नाही. त्याच्या निषेधार्थ गर्जे यांनी प्रतीकात्मक मुतारी तयार करून शहरातून तिची सवाद्य मिरवणूक काढली व प्रतिकात्मक उद्घाटन केले.
पाथर्डी शहरामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी नगरपरिषदने शहर हद्दीत मुतारी बांधावी या प्रमुख मागणीसाठी अभिनव आंदोलन करत मुतारीचा प्रतीकात्मक सांगाडा तयार करून नगरपरिषदेला सप्रेम भेट देण्यात आला.
सांगाड्याची शहरातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. चौका चौकात नागरिकांच्या हाताने नारळ फोडून उद्घाटन केल्यानंतर मुतारी नगरपालिका पदाधिकाऱ्यांना भेट देण्यात आली.