महाराष्ट्र
पाथर्डी,शेवगावसह 'या' १० पालिकांच्या प्रभागरचनेसाठी सुधारित कार्यक्रम ; हरकती व सूचना; ६ जूनला अंतिम प्रभाग रचना
By Admin
पाथर्डी,शेवगावसह 'या' १० पालिकांच्या प्रभागरचनेसाठी सुधारित कार्यक्रम ; हरकती व सूचना; ६ जूनला अंतिम प्रभाग रचना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, राहता, राहुरी, देवळाली प्रवरा व नेवासे या दहा पालिकांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांचा सुधारित कार्यक्रम सोमवारी जाहीर केला.
नागरिकांना प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना दाखल करता येणार आहे. अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोग ६ जूनला जाहीर करणार आहे. त्यामुळे या निवडणुकांचा बिगूल लवकरच वाजेल.
प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर झालेल्या पालिकांपैकी नेवासे वगळता इतर सर्व ९ पालिकांची मुदत वर्ष-दीड वर्षांपूर्वी संपली आहे. सध्या तेथे प्रशासक नियुक्त आहेत. नेवासे पालिकेची मुदत पुढील महिन्यात संपत आहे. शिर्डीला नुकतीच नगरपरिषद जाहीर करण्यात आली. पूर्वी तेथे नगरपंचायतसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र ग्रामस्थांनी नगरपरिषदेच्या मागणीसाठी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. सुधारित कार्यक्रम जाहीर झालेल्यामध्ये शिर्डीचा समावेश नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाचे याकडे लक्ष वेधले आहे. शिर्डीसाठी लवकरच स्वतंत्र कार्यक्रम जाहीर होईल, असे समजते. जिल्ह्यातील अकोले, पारनेर व कर्जत या तीन पालिकांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या तर श्रीगोंदे पालिकेची मुदत संपण्यास अद्याप अवधी आहे. जिल्ह्यात एकूण १५ नगरपालिका आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने २२ फेब्रुवारीला वरील १० पालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. पूर्वीचा हा कार्यक्रम हरकती व सूचना मागविण्याच्या टप्प्यावर असतानाच १० मार्चला ओबीसी आरक्षणाचा वाद व त्यातून राज्य सरकारने प्रभाग रचनेचा अधिकार स्वत:कडे घेतल्याने हा कार्यक्रम थांबवला गेला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर करून त्याला पुन्हा चालना दिली आहे. त्यामुळे १० पालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते.
सुधारित कार्यक्रम
• प्रारुप प्रभाग रचनेवर आक्षेप व हरकती मागवण्याचा कालावधी दि. १० ते १४ मे.
• प्राप्त हरकती व सूचनांवर जिल्हाधिकाऱ्यांकडे २३ मेपर्यंत सुनावणी होईल.
• जिल्हाधिकारी या हरकती व सूचनांच्या अनुषंगाने ३० मेपर्यंत आपला अहवाल राज्य निवडणूक आयुक्तांना पाठवतील.
• राज्य निवडणूक आयोग दि. ६ जूनला अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देतील.
• ७ जून रोजी जिल्हाधिकारी त्यास प्रसिद्धी देतील.
पालिकानिहाय सदस्यसंख्या
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालकांनी यापूर्वीच जिल्ह्यातील पालिकांतील सदस्यसंख्या निश्चित केली आहे. त्यानुसार सर्वाधिक सदस्यसंख्या श्रीरामपूरमध्ये (३४) तर सर्वात कमी सदस्यसंख्या नेवासे (१७) येथे आहे. जामखेड (२४), कोपरगाव (३०), राहुरी (२४), पाथर्डी (२०), शेवगाव (२४), देवळाली प्रवरा (२१) व राहता (२०). सन २०११ ची लोकसंख्या तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या विचारात घेऊन विभागीय आयुक्तांनी पालिकांनिहाय सदस्यसंख्या निश्चित केली आहे. त्यानुसार संगमनेर, पाथर्डी व शेवगाव या पालिकांमध्ये अनुसूचित जमातीचा एकही सदस्य नसेल तसेच यापूर्वी जागा महिला राखीव ठेवली गेल्याने जामखेड, कोपरगाव, नेवासा या पालिकांमध्ये अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी यंदा जागा राखीव नाही.
Tags :
29911
10