महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या विकासामध्ये कामगार वर्गाचा मोठा वाटा – अभय आव्हाड
By Admin
महाराष्ट्राच्या विकासामध्ये कामगार वर्गाचा मोठा वाटा – अभय आव्हाड
कामगार दिनानिमित्त कामगारांना भेटवस्तू व स्नेहभोजन
पाथर्डी- प्रतिनिधी
आर्थिक परिस्थिती चांगली नसणाऱ्या लोकांना आयुष्यात भरपूर कष्टाची कामे करावी लागतात. जगण्यासाठी पुरेसा पैसा कमावणे याची चिंता करण्यात त्यांचे आयुष्य जाते. कामगार हा उन्हात काबाडकष्ट करून अर्धपोटी उपाशी राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. महाराष्ट्राच्या जडणघडणीत शेतकरी वर्गाबरोबरच कामगारांचाही मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचा कामगार वर्ग हा एक आधारस्तंभ आहे म्हणून या कामगार वर्गाची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी, तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा केल्याचा आनंद होईल, असे प्रतिपादन पाथर्डीचे मा. नगराध्यक्ष व पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले.
ते थोर स्वातंत्र्यसेनानी, कामगार नेते, मा. आ. स्व. बाबुजी आव्हाड यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात आयोजित कामगार मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त नायब तहसीलदार जगदीश गाडे तर व्यासपीठावर उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, दत्ताशेठ सोनटक्के, बबन सबलस, संदीप आव्हाड, ज्ञानेश्वर कोकाटे, किशोर परदेशी, गणेश टेके, हबीब भाई, साळवे साहेब आदी उपस्थित होते.
अभय आव्हाड पुढे म्हणाले, कामगारांच्या हक्कासाठी उभारलेल्या लढ्यामुळे जगभरात एक नव्या क्रांतीची सुरुवात झाली म्हणून भारतासह जगातील ८० देशात आजचा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र दिन व कामगार दिन एकाच वेळी येतो हा योगायोग नसून महाराष्ट्राच्या निर्मितीचा मुहूर्त जागतिक कामगार दिन ठरविण्यात आला. मुंबईसह आजच्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी कामगार नेत्यांच्या नेतृत्वाखाली चळवळ उभारण्यात आली यामध्ये कॉ. श्रीपाद अमृत डांगे, कॉ. मिरजकर, क्रांतिसिंह कॉ. नाना पाटील तसेच कॉ. बाबुजी आव्हाड आदी कामगार नेत्यांचा मोलाचा वाटा होता. मा. आमदार स्व. बाबुजी आव्हाड हे कामगार नेते होते व ते आयुष्यभर कामगारांच्या हितासाठी झटत राहिले. तीच शिकवण घेऊन अभय आव्हाड प्रतिष्ठानने वेळोवेळी कामगारांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना काळातही या घटकाच्या मदतीसाठी प्रतिष्ठान प्रयत्नशील राहिले आहे. कामगारांनी आपल्या मुलांना शिकवावे, त्यांना शिक्षणासाठी लागणारी सर्वोतोपरी मदत प्रतिष्ठान करेल, असे आश्वासन अभय आव्हाड यांनी उपस्थित कामगारांना दिले.
यावेळी नगरपालिकेत चांगली सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले पालिकेचे कर्मचारी शरदराव पाथरकर, दादा मर्दाने, सुरेशराव इजारे, महादेव पालवे, मुकुंद रावस, बंडू पाठक, विठ्ठल पाटोळे, दिलीप चौधर, रविंद्र दारके यांचा सन्मान अभय आव्हाड प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला.
याप्रसंगी मर्दाने सर, बंडू पाठक व मुख्याध्यापक शरद मेढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संदीप आव्हाड यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला. तसेच कामगार दिना निमित्त उपस्थित कामगारांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन प्रतिष्ठान मार्फत करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या सन्मानामुळे कामगारांनी अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ. बबन चौरे तर आभार डॉ. अभिमन्यू ढोरमारे यांनी मानले.
Tags :
69
10