महाराष्ट्र
पुण्यकर्मी डॉ. करकरीया यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर
By Admin
पुण्यकर्मी डॉ. करकरीया यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर
पाथर्डी- प्रतिनिधी
एखाद्या रुग्णाला वेळेवर रक्त मिळाल्यास त्या रुग्णाचे प्राण वाचविण्याचे महत्वाचे कार्य रक्त करते. यामुळे वेळोवेळी रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येते त्यामुळे गरजू व्यक्तींचे प्राण वाचवले जाऊ शकतील म्हणूनच रक्तदाता हा रुग्णांसाठी नेहमीच आशेचा किरण ठरला आहे, असे प्रतिपादन पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले.
ते येथील आरोग्य माता केंद्र यांच्याकडून पाथर्डी तालुक्यातील रुग्णसेवेची निरंतर व अखंडित २० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तसेच पुण्यकर्मी डॉ. करकरीया यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे उद्घाटनप्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर डॉ संदीप सूसे, सिस्टर मेरी ईपन, भक्ती निवासचे प्रमुख धर्मगुरू फादर राजू शेळके, फादर जोशी, नित्यसेवा हॉस्पिटल शेवगाव येथील सिस्टर लुसी डीब्रिटो, सिस्टर ज्युली डिसोझा, सिस्टर बेट्टी, सिस्टर संगीता, आरोग्य माता केंद्र येथील स्रीरोग तज्ञ डॉ स्वाती सूसे, जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर येथील डॉ विलास मडीकर, डॉ रोहन आडकर, सिस्टर निर्मला आदी उपस्थित होते.
अभय आव्हाड पुढे म्हणाले, गेल्या २० वर्षापासून आरोग्य माता केंद्र निरंतर, निस्वार्थी व उल्लेखनीय सेवा देत आहे. गोरगरीब व गरजू तसेच हालाकीची परिस्थिती असणाऱ्या लाखो रुग्णांची सेवा करण्याचे भाग्य डॉ. करकरीया बाई यांना मिळाले. रुग्णसेवा हीच देवपूजा समजून डॉ. करकरीयांनी संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेले हे रक्तदान शिबीर निश्चितच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे आहे.
सदर रक्तदान शिबिरात ५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या एन सी सी छात्रांनी व एन एस एस च्या स्वयंसेवकानी रक्तदानात सहभाग घेतला.
यावेळी अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानमार्फत येथील वसतीगृहातील मुलींना खेळाचे साहित्य तसेच आरोग्य माता केंद्रास डिजीटल बोर्ड भेट देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिता पगारे, सुत्रसंचालन पंकज पगारे तर आभार संचालिका सिस्टर शीला जाधव यांनी मानले.
Tags :
3749
10