पाथर्डी तालुक्यात आगीत झोपडी जळून संसारोपयोगी साहित्य जळून खाक
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील एका पत्र्याच्या झोपडीला आग लागून झोपडीतील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. शहरातील वीर सावरकर मैदानातील भाजी बाजार तळ येथे पाथर्डी नगरपरिषदेच्या इमारतीजवळ शकुंतला गंगाधर पडुळकर या 65 वर्षीय वृद्ध महिला पत्राच्या झोपडीमध्ये एकट्या राहतात.
शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या झोपडीला आग लागली. आगीत घरातील कपडे, संसारोपयोगी साहित्य व कागदपत्रे जळून खाक झाली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर बाजूलाच असलेल्या शौकत शेख व विनोद पठाण या तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे प्रयत्न अयशस्वी ठरले. आगीमध्ये सर्व साहित्य जळून खाक झाल्याने वृद्धेचा संपूर्ण प्रपंच उघड्यावर आला आहे. आगीची माहिती पाथर्डी नगरपरिषदेच्या अग्निशामक विभागाला मिळाल्यानंतर अग्निशामक बंबाने पूर्ण आग विझवली. शकुंतला पडुळकर या झोपडीतच शेतीची लोखंडी अवजारे बनविण्याचे कष्टाचे काम करून उपजीविका भागवतात. पोटाची खळगी भरण्यासाठी थोड्याफार पैशांवर दररोज किराणा आणतात. त्यातच आता संपूर्ण प्रपंच भस्मसात झाल्याने त्यांच्यापुढे हाता-तोंडाची भेट होण्याचा गंभीर प्रसंग निर्माण झाला आहे.