विजेच्या धक्का लागून ४ सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
विद्युत वाहिनीचा जोराचा धक्का लागून आंघोळीला गेलेल्या ४ सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावाअंतर्गत येठेवाडीच्या वांदरकडा परिसरातील नाल्याच्या काठावर आज (दि.८) दुपारी घडली.
दर्शन अजित बर्डे (वय ६), विराज अजित बर्डे (वय ५), अनिकेत अरुण बर्डे (वय ८), ओमकार अरुण बर्डे (वय ७) सर्व रा. येठेवाडी नांदूर खंदरमाळ या ४ सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवार दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली .
याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर खंदर माळ नजीक असणाऱ्या येठेवाडी शिवारा तील वांदरकडा परीसरात अजित आणि अरुण हे दोघे भाऊ आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. मोलमजुरी करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. या दोघा भावांची चिमुरडी ४ मुले शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर जवळच असलेल्या एका छोट्याशा तळ्यावर आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी अचानक विद्युत वाहिनीचा त्यांना जोरदार धक्का लागला. यात ही चारही मुले जागीच ठार झाली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर आणि अशोक वाघ व परिसरातील नागरिकांनी मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात नेण्यात आली.