महाराष्ट्र
शेवगाव-नगर महामार्गावरील रस्ते हरवले खड्ड्यांत!
By Admin
शेवगाव-नगर महामार्गावरील रस्ते हरवले खड्ड्यांत!
रस्त्यावर कुठला खड्डा चुकवावा हेच समजत नाही नागरीकांचा संताप
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील रस्ते निराधार झाले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा आकार वारेमाप रुंदावत चालल्याने प्रवाशांची हाडे खिळखिळी होत असून, त्यांचे आयुर्मान कमी होत चालले आहे.
विकासासाठी वार्यावर सुटलेला हा तालुका सध्या वाल्मिकीच्या शोधात आहे. अनेक रस्ते खड्ड्यांत हरवले असताना, सत्ताधारी आणि विरोधक एकाच माळेचे मणी झाले आहेत.
दुरुस्तीअभावी अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये दिवसेंदिवस भरच पडत आहे. यावर्षी नाहीतर पुढच्या वर्षी तरी मजबूत रस्ते होतील, ही अपेक्षा प्रत्येक वर्षी फोल ठरत चालल्याने जनतेच्या संतापाने परिसीमा गाठली आहे. शेवगाव-नेवासा, शेवगाव-तिसगाव, शेवगाव-मिरी, शेवगाव-पैठण, शेवगाव-गेवराई हे सर्वच राज्यमार्ग खडतर झाले आहेत. खेडोपाडी जोडलेल्या ग्रामीण रस्त्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. एवढेच नव्हे, तर अवघ्या काही महिन्यात पुलांची, डांबरीकरण झालेल्या रस्त्यांची झालेली दुरवस्था, कामाच्या दर्जाबाबत बरेच काही सांगणारी ठरत आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांना बळी गेला आहे, अनेकांना अपंगत्व आले आहे, तर अनेकांना हाडांच्या व्याधी निर्माण झाल्या आहेत. अशा खडतर रस्त्याचा प्रवास सर्वांनाच असह्य झाला आहे. एकेकाळी रस्त्याच्या बाबतीत शेजारील मराठवाडा मागास समजला जात होता. आता मराठवाडा शेवगावास मागास समजत आहे. या बदलास कोण कारणीभूत असावे, याचे आत्मपरीक्षण करण्यास सुरुवात झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारे नेवासा-शेवगाव- गेवराई 99 कि.मी., पांढरीपूल-मिरी-शेवगाव 24 कि.मी., तिसगाव-शेवगाव- पैठण 29 कि.मी., या प्रमुख राज्यमार्गात, तसेच 292 कि.मी. असणारे जिल्हा मार्ग यातून प्रवास करताना अपवाद वगळता कुठचा खड्डा चुकवावा हेच समजत नाही. त्यामुळे प्रत्येक खड्ड्यात जाणारे चाक दोन लाखोलीचे शब्द काढणारे ठरत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अखत्यारित असलेले 245 कि.मी.चे 23 इतर जिल्हा मार्ग व 611 कि.मी.चे 217 ग्रामीण मार्गापैकी कुठेतरी अर्धा सुखाचा प्रवास होतो.
Tags :
417
10