अहमदनगर जिल्ह्याचा देशपातळीवर सन्मान
By Admin
अहमदनगर जिल्ह्याचा देशपातळीवर सन्मान
अहमदनगर- प्रतिनिधी
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत भौतिक तपासणी संवर्गात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यास प्राप्त झाला. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी नवी दिल्ली येथे आज पुरस्कार स्वीकारला.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त देशभरातील उत्कृष्ट कामगिरी बजावणार्या जिल्ह्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यास हा सन्मान प्रदान करण्यात आला.
यावेळी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे उपस्थिती होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले व निवासी उपजिल्हाधिकारी निचित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्ह्याला हा पुरस्कार मिळाला. योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी 5 टक्के लाभार्थ्यांची भौतिक तपासणी विहित मुदतीत केल्यामुळे पुरस्कार देण्यात आला. जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये पोर्टलवर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 6 लाख 98 हजार 914 आहे.
या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत 719 कोटी 58 लाख 70 हजारांचा निधी पोर्टलद्वारे जमा झाला आहे. भौतिक तपासणीसाठी 28 हजार 802 लाभार्थ्यांची यादी पोर्टलद्वारे प्राप्त झाली होती. त्याचे कामकाज जिल्ह्याने शंभर टक्के पूर्ण केले. या 28 हजार 802 लाभार्थ्यांपैकी 26 हजार 612 लाभार्थी पात्र असून, 2 हजार 190 लाभार्थी अपात्र ठरले आहेत.
आयकर भरणारे व इतर कारणामुळे अपात्र झालेल्या लाभार्थ्यांकडून 9 कोटी 19 लाख 56 हजार इतक्या रकमेची वसूली करण्यात आली. तालुकास्तरावर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी योजनेचे कामकाज ठरवून दिलेल्या उद्दिष्टांनुसार पूर्ण केले. या कामाची दखल थेट देशपातळीवर घेण्यात आली.