जनता विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात
By Admin
जनता विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील जनता विद्या मंदिरच्या सन १९८७ च्या बॅच मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा दुसरा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
तब्बल 33 वर्षांनी हे विद्यार्थी २०१९ ला एकत्र आले होते. त्यानंतर हे सर्व विद्यार्थी पुन्हा एकत्र येऊन, जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.शालेय जीवनातल्या सर्व आठवणींनी सर्व माजी विद्यार्थी भारावून गेले होते.
सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुखदेव शिंदे, मिनीनाथ झाडे, देविदास पारखे,किशोर पारखे, विजय भगत, सदाशिव खेडकर, कारभारी
खेडकर,गोरख खाडे यांनी एकत्र येऊन स्नेहमेळाव्याचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केले होते. सरस्वती पुजनानंतर आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे मीनाक्षी साळवे- शेरकर हिने स्वागत गीताने सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक सुखदेव शिंदे यांनी केले.नंतर कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचा सत्कार संजय भंडारी व सीमा भंडारी यांनी प्रत्येकाला गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. त्यानंतर मनोगत व्यक्त करण्यात आले. मनोगताची सुरुवात (पी-आय )विठ्ठल बडे यांनी केली. कारभारी खेडकर याने याही वयात आलेल्या संकटाकडे सकारात्मक दृष्टीने कसे बघायाचे ? हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. त्यानंतर प्रत्येकाने आपल्या वर्गातील आठवणींचा साचलेला बांध मोकळा केला. मनोगत ऐकत असताना सर्व माजी विद्यार्थी अगदी भारावून गेले होते.
माजी विद्यार्थ्यात पोलीस इन्स्पेक्टर, हवालदार, पोलीस प्राध्यापक, शिक्षक, कोर्टातील अधिकारी, कंपनीतील अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, मोठ- मोठे व्यवसायिक, शेतकरी, मजूर,ऊसतोडणी कामगार अशा सर्व प्रकारच्या सर्व स्तरांमधून मित्र-मैत्रिणी चा मेळावा एकत्र जमला होता.दिसायला एवढी मोठी दरी होती, पण कुठेही भेदाभेदला थारा नव्हता. आपण सर्व एकाच वर्गात बसलेले विद्यार्थी आहोत, हा पवित्र भाव मात्र या कार्यक्रमात क्षणाक्षणाला दिसून येत होता. शेतातल्या मजूराने जेव्हा पोलीस दलातील उच्च अधिकारी असलेले विठ्ठल बडे यांना मिठी मारली, तेव्हा हे अनुपम दृश्य बघून नेत्र सुख घेत होते. विष्णुमय जग वैष्णवांचा। धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ। हा भाव प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला. यानंतर दुपारी सर्वांनी मिष्ठान्न भोजनाचा मनमुराद आस्वाद घेतला.सर्वजणां सोबत बसून मन मोकळेपणाने ,अस्थेने एकमेकाशी हितगुज करत होते. हे दृष्य अतिशय भावस्पर्शी होते.
भोजनानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात भजने, गवळणी, विनोद, लावणी, चित्रपटातील गाणी, उखाणे अशा सर्व प्रकारच्या कलागुणांना वाव मिळाला. त्यामुळे संसाराच्या ओझ्याखाली दडलेलं हे आयुष्य कसं विसरायचं हे एका दिवसाने दाखवून दिले .जीवनामध्ये मुक्तछंद आनंद कसा घ्यावा, हे या गेट-टुगेदर च्या कार्यक्रमातून सगळ्यांना समजलं. शेवटी सुखदेव शिंदे यांनी निरोपाचे गीत घेऊन पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.कारभारी याने सर्वांचे आभार मानले आणि सर्व मित्र आणि मैत्रिणी यांनी जड अंतकरणाने निरोप घेतला. वेगवेगळ्या दिशेने आलेले मित्र आपापल्या गावी नवी उर्जा घेऊन गेले.