जिल्ह्यातील मतदार संख्या पोहचली 'इतक्या ' लाखावर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील निवडणूक शाखेतील विविध घटकांनी केलेल्या निरंतर जनजागृती व कामामुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या 35 लाख 57 हजारांच्या पूढे गेली आहे. जिल्हयाची मतदार यादी अधिक दोषविरहीत आणि सर्व समाज घटकांना सामावून घेण्यावर भर देण्यात येणार असल्याची जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले हाेते. उप जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार चंद्रशेखर शितोळे, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, शंकर थोडे आदी उपस्थित होते. मुख्य राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे औरंगाबाद येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना नाशिक विभागातील उत्कृष्ट जिल्हा निवडणूक जिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला.
जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या 35 लाख 57 हजार 266 इतकी झालेली आहे. यातील महिला मतदारांची संख्या 17 लाख 6 हजार 127 इतकी असून पुरुष मतदारांची संख्या 18 लाख 50 हजार 954 इतकी आहे. आपल्या या मतदारांमध्ये 16 हजार 727 इतके दिव्यांग मतदार असून 185 तृतीयपंथी मतदार आहेत. विशेष मोहिमेच्या कालावधीत जिल्हयातील मतदारांमध्ये 28 हजार 724 इतक्या नवमतदारांची भर पडल्याची माहिती भोसले यांनी यावेळी दिली.